बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार आणि कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 95 रूग्ण बीड जिल्ह्यामध्ये आढळून आले. प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार आणि कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई आणि बीड शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. याचा फैलाव बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागातही होऊ शकतो. अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातील काही तालुके कोरोना रूग्णांच्या बाबतीत निरंक असताना आता त्या तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी शुक्रवारी ठोस पाऊले उचलायला सुरूवात केली आहे.

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढलेल्या आदेशात अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यात बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार आणि इयत्ता दहावी, बारावीचे क्लासेस वगळता इतर कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. अनेक मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणारे संमेलन, मेळावे प्रतिबंधीत केले आहेत. फळभाज्या आणि वस्तू विक्रेत्यांना सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात आठवडी बाजारात तोबा गर्दी होते, त्यात वडवणी, नेकनूर, चौसाळा, हिरापूर, कुप्पा, सिरसाळा, माजलगाव, धारूर, परळी, केज, युसुफवडगाव, पाटोदा, आष्टी, कडा, शिरूर सह तब्बल 50 ठिकाणचे आठवडी बाजार डोक्याला ताण देणारे आहेत. म्हणूनच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या