बीडजवळ भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

बीड येथे झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अंबाजोगाई येथील प्रतिष्ठीत व्यापारी जितेंद्र झंवर हे आपल्या कुटुंबासह संभाजीनगरहून अंबाजोगाईकडे येत असताना कोळवाडीजवळ ट्रक सोबत झालेल्या अपघातात ज्योती जितेंद्र झंवर (46) यांचा जागीच मृत्यू झाला तर जितेंद्र झंवर आणि मुलगी रजत झंवर हे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे झाला.

अंबाजोगाई येथील जितेंद्र झंवर हे व्यापारी आणि डिस्ट्रीब्युटरचे मालक आहेत. एका व्यवसायासंदर्भात ते संभाजीनगरला गेले होते. संभाजीनगरहून काम आटोपून गुरूवारी रात्री बाराच्या सुमारास अंबाजोगाईकडे परत निघाले. दिवसभरातली दगदग असताना मुक्काम करण्याऐवजी ते रात्रीच अंबाजोगाईकडे परत निघाले होते. बीडच्या पुढे असलेल्या एका हॉटेलवर आराम करण्याचे ठरले होते. मात्र तत्पूर्वीच कोळवाडीजवळ पहाटे दिडच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या एका ट्रकला कारने मागच्या बाजूने धडक दिली. भीषण अपघातानंतर कारचे एअरबॅग उघडले. त्यात जितेंद्र झंवर हे सुखरूप बचावले मात्र शेजारी असलेल्या त्यांच्या पत्नी ज्योती जितेंद्र झंवर (46) या जागीच ठार झाल्या. जितेंद्र झंवर आणि त्यांची मुलगी रजत (19) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संभाजीनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.