राष्ट्रवादीतील राष्ट्रवाद संपला – आमदार जयदत्त क्षीरसागर

137

सामना प्रतिनिधी। बीड

सर्वसामान्य गोरगरीबांचे प्रश्‍न सोडवून जनहिताचा विचार कोण करतो याचा विचार करा. राष्ट्रवादी पेक्षा राष्ट्रवादाला महत्व द्या, महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितम मुंडे यांना विजयी करून देश हिताचा निर्णय घ्या असे आवाहन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे. शहरातील धानोरा रोड, बालेपीर, नगर रोड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत आ.जयदत्त क्षीरसागर बोलत होते.

यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, या पक्षात सातत्याने वादावादी चालू असते त्यात घुसमटत राहण्यापेक्षा लोकहिताचे निर्णय घेणार्‍या महायुतीबरोबर जाण्याचा आपण निर्णय केला. कणखर मनगटाचा पंतप्रधान आपल्यामध्ये असल्यामुळे देश मजबूत झाला आहे. इथे काम करणारांचे पाय ओढायचा आणि हूजरेगिरी करणार्‍यांना झेलायचे. ज्या पक्षात राष्ट्रवादाची विचार धाराच राहिली नाही, ध्येय धोरणचे राहिली नाही, समाजाचे, राज्याचे आणि राष्ट्राचे देणेघेणेच नसणार्‍यांना आपण मतदान करणार का? असा सवाल करून देश आणि जनहिताचे निर्णय घेणार्‍या महायुतीला मतदान करून मताधिक्याने विजयी करावे. ते म्हणाले की, युती सरकारने बीड शहराच्या विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद करून बीड रेल्वेसाठीदेखील मोठा निधी दिला आहे. विकासाचे मोठे आराखडे आगामी काळातही करून घ्यायचे आहे त्यासाठी महायुती सत्तेवर असणे गरजेचे आहे. रस्ते, वीज आणि पाणी या मुलभूत गरजा भविष्य काळात पूर्ण झाल्या पाहिजेत असे ते म्हणाले. यावेळी धानोरा रोड परिसरातील हजारो मतदार बंधु-भगिनी उपस्थित होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या