
पवनचक्कीचे काम करणाऱ्या अवादा कंपनीकडे वाल्मीक कराड यानेच दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची स्पष्ट कबुली विष्णू चाटे याने सीआयडीसमोर दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच कबुलीजबाबाचा आधार घेत सीआयडीने केज न्यायालयात आवाजाचे नमुने घेण्यासाठी वेळ लागणार असल्याने कोठडी देण्याची मागणी केली होती. विष्णू चाटेच्या कबुलीमुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून अतिशय अमानुष हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी विष्णू चाटे याच्यासह जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार या चौघांना अटक करण्यात आली आहे. सीआयडीकडून या चौघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. सीआयडीसमोर या चौघांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या चौकशीत विष्णू चाटे याने वाल्मीक कराड यानेच अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. दोन कोटी रुपयांची खंडणीही त्यानेच मागितली होती, अशी कबुली दिली असून याच आधारे सीआयडीने वाल्मीक कराडच्या आवाजाचे नमुने घ्यावयाचे असल्यामुळे कोठडी देण्याची मागणी केज न्यायालयात केली होती. केज न्यायालयाने ही मागणी मान्य करूनच वाल्मीक कराडची 14 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.
विष्णू चाटेच्या कबुलीजबाबामुळे वाल्मीक कराडचा खंडणी प्रकरणात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच खंडणी प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. चाटेच्या कबुलीने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरेही वाल्मीक कराडपर्यंत पोहोचवले आहेत.
वाल्मीक कराडचा मुक्काम बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. तेथे निर्बंध असणे अपेक्षित आहे. मात्र त्या कोठडीचे दरवाजे सताड उघडे आहेत. साडी नेसून पोलीस अधिकाऱ्यानेच करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवले!
करुणा मुंडे यांच्या गाडीत ‘आका’च्या सांगण्यावरूनच पिस्तूल ठेवण्यात आले होते. साडी नेसून ते पिस्तूल ठेवणारा पोलीस अधिकारीही मला माहिती आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. पिस्तूल ठेवणाऱ्या त्या अधिकाऱ्याचे नाव आपण पोलीस अधीक्षकांनाच सांगू, असेही ते म्हणाले.