
क्षीरसागरांचे बीड जिल्ह्यावरील प्राबल्य अजित पवारांना नेहमीच खटकत राहिल. एकत्र राष्ट्रवादीमध्ये असतानाही ओबीसीचे नेतृत्व मोडून काढण्यासाठी अजित पवारांनी जयदत्त क्षीरसागरांना अप्रत्यक्षपणे परिस्थिती निर्माण करून राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यानंतर पुतण्या संदीप क्षीरसागरांना उभे करून चुलत्या-पुतण्यामध्ये वादंग निर्माण केला. तर आता दुसर्या पुतण्या योगेश क्षीरसागरांना बेदखल केले. क्षीरसागरांशिवाय बीडमध्ये नेतृत्व उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न नगरपालिकेमध्ये काही प्रमाणात यशस्वी झाला असला तरी ‘आसमान से गिरा और खजुर पे अटका’ अशी परिस्थिती निर्माण झाली. नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला असला तरी बहुमतासाठी कोणत्या तरी क्षीरसागरांना चुचकारावेच लागणार आहे. यात आमदार संदीप क्षीरसागरांची बार्गनिंग पावर वाढली आहे.
राष्ट्रवादी एकत्र असताना ओबीसीचे नेते आणि बीड जिल्ह्यातील मोठी हस्ती म्हणून जयदत्त क्षीरसागरांना महत्वाची खाती द्यावी लागत होती. सार्वजनिक बांधकाम उर्जामंत्री असताना जयदत्त क्षीरसागरांनी राज्यात ओबीसीची मोट आवळायला सुरूवात केली होती. ओबीसीचे हे नेतृत्व मोडित काढण्यासाठी अजित पवारांनी एक मोहिम राबविली. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जयदत्त क्षीरसागरांचा स्वाभिमान कसा दुखावेल याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातूनच अजित पवार आणि जयदत्त क्षीरसागरांमध्ये दुरावा निर्माण झाला. एकवेळ तर अशी परिस्थिती निर्माण झाली जयदत्त क्षीरसागरांना २०१८ मध्ये राष्ट्रवादीतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर त्यांनी संदीप क्षीरसागरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जयदत्त क्षीरसागरांवर निशाना धरला. लगेच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत आघाडी स्थापन करून संदीप क्षीरसागरांना निवडणूक लढवण्यासाठी प्रेरित केले. यातून क्षीरसागर कुटुंबामध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादीने जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात बीडमधून संदीप क्षीरसागरांनाच उभे करत निवडून आणले. पुढे संदीप क्षीरसागर, शरद पवारांसोबत गेले. कालांतराने अजित पवारांनी योगेश क्षीरसागरांच्या माध्यमातून बीडमध्ये राष्ट्रवादीची घडी बसवायला सुरूवात केली.
आत्ताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात अजित पवारांनी योगेश क्षीरसागरांना मैदानात उभे केले. मात्र संदीप क्षीरसागरांचा विजय झाला. नगर पालिका निवडणुका लागल्या आणि पुन्हा एकदा अजित पवारांनी बीडमध्ये क्षीरसागर मुक्तीचा अप्रत्यक्ष नारा देत योगेश क्षीरसागरांचा पत्ता कट केला. अजित पवार गटातून बाहेर पडलेले योगेश क्षीरसागर थेट भाजपाच्या तंबूत दाखल झाले. नगरपालिका निवडणुकीत क्षीरसागरांच्या मतांची उभी फुट पडली. त्यात ३५ वर्षानंतर क्षीरसागरांशिवाय बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये अजित पवारांना यश आले. राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ३२ हजार मते घेवून विजयी झाला असला तरी दोन क्षीरसागरांच्या उमेदवारांची गोळा बेरीज ५८ हजाराच्या घरात जाते. आसमान से गिरा और खजूर पे अटका अशी परिस्थिती अजित पवार गटाची झाली. त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी बहुमताचा आकडा पार करता आला नाही.
उपनगराध्यक्ष आणि उर्वरित सभापती पदासाठी २७ मताचा आकडा ओलांडायचा आहे. तेवढे संख्याबळ अजित पवारांकडे नाही. यासाठी त्यांना कोणत्या तरी क्षीरसागरांचीच मदत घ्यावी लागेल. मग तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर असो की, भाजपाचे योगेश क्षीरसागर असो यांच्या मदतीशिवाय अजित पवारांचा कोरम पूर्ण होणार नाही. सध्या तरी अजित पवारांना योगेश क्षीरसागरांपेक्षा आमदार संदीप क्षीरसागर यांचे मन वळवण्यामध्ये यश मिळू शकते. म्हणूनच आ.संदीप क्षीरसागरांची बार्गनिंग पावर आता वाढली आहे. बीडमध्ये अजित पवारांना आपले बस्तान बसवायचे असेल तर क्षीरसागरांशिवाय पर्याय नाही हेच नक्की.





























































