
बीड जिल्हा पोलीस दलात बुधवारपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. भरतीसाठी आलेला एक तरुण धावून झाल्यानंतर अचानक चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
बीड शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज पहाटे पाच वाजता पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. 174 पदांसाठी आठ हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी झालेली आहे. त्या दृष्टीने भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यात आलेले आहे. पहाटे पाच वाजता पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या उपस्थितीत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास 1600 मीटर धावणे पूर्ण झाल्यानंतर दीपक भास्कर वाव्हळे (26, रा.परळी) या तरुणाला अचानक चक्कर आली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. हृदयविकाराचा धक्का बसल्याने दीपकचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. मात्र शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पोलीस भरतीसाठी पहाटे पाच वाजल्यापासून ग्राऊंडला सुरुवात होत आहे. मात्र रनिंग आणि इतर प्रकार होईपर्यंत दुपार उलटत आहे. सध्या 10 नंतर कडक ऊन पडायला लागले आहे. उकाडादेखील वाढत आहे. त्यामुळे बीडमध्येच नव्हे, तर राज्यभरात पहाटे 5 ते 9 पर्यंत गाऊंड घेता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.





























































