
सामना प्रतिनिधी, बीड
काल युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी तरुणाई उत्साहात होती. जेव्हा आदित्य ठाकरे यांचे बीड विधानसभा मतदार संघात प्रवेश झाला. तेव्हा हजारो युवक आणि महिलांनी भगव्या रॅलीला सुरुवात केली. योगेश क्षीरसागर यांच्या नेत्रत्वाखाली निघालेल्या या प्रचंड रॅलीची राज्यभर सोशल मीडिया वर हवा निर्माण झाली आहे. या रॅलीने आदित्य ठाकरे देखील प्रभावित झाले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या एका दौऱ्याने बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण हादरून गेले. एवढा उत्साह, एवढी गर्दी, एवढा जल्लोष बरंच काही सांगून गेले. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने बीड भगवेमय झाले. जनआशीर्वाद यात्रा जेव्हा बीड विधानसभा मतदार संघाच्या प्रवेशद्वाराजवळ आली तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांच्या नेत्रत्वाखाली हजारो तरुणांची महारॅली निघाली. मोटार सायकल रॅली आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा बीडमध्ये शिरल्यावर तर उत्साहाला पारावार राहिला नाही. शहरातील बार्शी नाका येथून डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महिलांची महारॅली यात सहभागी झाली. या दोन रॅलीने संपूर्ण शहर दणाणून गेले. राज्यभर या रॅलीची हवा निर्माण झाली. स्वतः आदित्य ठाकरे यांनी दाखल घेत नियोजन आणि रॅलीच्या उत्साहाचे कौतुक केले.



























































