
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील बुखारी शाळेजवळ घडली.
गेवराईकडून येणारी मोटारसायकल एम. एच. 47 एएफ 0765 व माजलगावकडून गेवराई कडे जाणारी मोटार सायकल एम एच 12 क्यु 3207 यांची समोरासमोर धडक झाली. यात गणेश श्रीकिसन मिसाळ (35 वर्ष, रा. देवळा ता. सेलु जि परभणी), अजित शिवाजी राठोड (24, रा. लक्ष्मण नाईक तांडा केकतपांगरी ता. गेवराई) व अन्य एक महिला अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. शंकर जितू भोसले व आनंद मगन चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, जखमींवर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन बीडकडे हलवण्यात आले आहे. मयत महिलेची आतापर्यंत ओळख पटली नसून या घटनेनंतर सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

























































