इटलीत महात्मा गांधींच्या पुतळ्याची उद्घाटनापूर्वीच विटंबना

इटलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनडा, अमेरीका आणि ब्रिटेन नंतर खलिस्तान्यांनी इटलीकडे मोर्चा वळवला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे उद्घाटन होणार होते. मात्र उद्घाटनापूर्वीच त्याची विटंबना करण्यात आली आहे. शिवाय त्या पुतळ्याखाली खलिस्तान्यांनी हरदीप सिंह निज्जर याच्या समर्थनार्थ घोषणा लिहील्या आहेत. गुरुवारी होणाऱ्या जी7 शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर स्थानिक इटालियन अधिकाऱ्यांनी संशयित खलिस्तानवाद्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुतळ्याखाली लिहीलेला मजकूर पोलिसांनी पूसून टाकला आहे, तसेच महात्मा गांधी यांचा पुतळा पुनर्स्थापित करण्यात आला आहे.

ही घटना 13 ते 15 जून दरम्यान होणाऱ्या G-7 शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला घडली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. 50वे G-7 शिखर परिषद ही इटलीच्या अपुलिया भागातील बोर्गो एग्जाजियाच्या आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार आहे. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांच्या आमंत्रणानंतर शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गुरुवारी इटलीच्या अपुलिया येथे जाणार आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, परराष्ट्र सचिव मोहन क्वात्रा म्हणाले की, हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबना केल्याचे प्रकरण इटलीच्या अधिकाऱ्यांकडे उचलून धरले आहे. बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या नुकसानीचा मुद्दा इटालियन अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आला आहे. त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल.