बेलफास्ट आणि मुंबई!

571

>> द्वारकानाथ संझगिरी

जर तुम्हाला टायटॅनिक बोट कशी बांधली गेली, कशी ‘अपराजित’ म्हणून मिरवली गेली आणि कशी बुडाली हे नीट समजून घ्यायचं असेल तर उत्तर आयर्लंडमधल्या बेलफास्टला जायलाच हवं. मला या बोटीत भयानक रस. त्यामुळे मी डब्लिनमधून बेलफास्टला गेलो.

अर्थात बेलफास्टला जाण्यासाठी आणखी दोन कारणं होती. एक म्हणजे ते ‘म्युरल्स’चं शहर आहे. बेलफास्ट शहराच्या भिंतीवर त्यांचा इतिहास, त्यांची लढाई, त्यांची संस्कृती आणि जगातल्या घडामोडींवर अप्रतिम पेंटिंग्ज काढली गेली आहेत. काही पुसली जातात, काहींची नव्याने भर पडते. ही क्रांतिकारी म्युरल्स पाहणे हे एक माझ्यासाठी आकर्षण होते.

…आणि दुसरे म्हणजे ब्रिटिश राज्यकर्ते जो ‘फाळणी फाळणी’ खेळ आयर्लंडमध्ये खेळले तो पुढे काही वर्षे बेलफास्टच्या रस्त्यावर खेळला गेला. एका बाजूला कॅथलिक मंडळी, दुसऱया  बाजूला प्रोटेस्टंटचे पेटते निखारे असे ते द्वंद्व होते. बॉम्ब फुटले, आगी लागल्या, माणसे मेली. आता ते सर्व शांत झालंय, पण राखेखाली धुगधुगी आहे. ती आजही जाणवते. ते कसं घडलं, कुठे घडलं ते मला पाहायचं होते. जमलं तर तिथल्या मंडळींशी बोलायचं होतं. बेलफास्टच्या छोटय़ा वास्तव्यात हे सर्व जमून गेलं. या सर्व घटना एका लेखातून नक्कीच रेखाटता येणार नाहीत, पण पुढच्या काही लेखांमधून रेखाटण्यापूर्वी बेलफास्टची थोडी माहिती घ्यायला हवी. हे शहर ‘फास्ट’ कसं वाढलं हे जाणून घेतलं पाहिजे.

आयर्लंडमधल्या 1840 च्या महासंहारक दुष्काळानंतर माणसे गावांतून शहरात आली. ती बेलफास्टला आली. कारण तिथे कापड गिरण्या उभ्या राहिल्या होत्या. बंदर वाढून शिपयार्डस् तयार झाली होती. पाच-सहा वर्षांत शहर कसे वाढले याचे एक उदाहरण नुसते लोकसंख्येचा आधार घेऊन देतो. तुम्हाला कल्पना आहे की, युरोपमध्ये लोकसंख्या हिंदुस्थान-चीनसारखी कधी वाढली नाही, पण 1851 साली बेलफास्टमध्ये सत्त्याऐंशी हजार माणसे राहत होती. 1901 साली ती 3,49,180 झाली. तिपटीपेक्षा जास्त! ‘जवसाचे’ पीक तिथे जोरात येत असे. त्यातून कापड निर्माण होते. 19व्या शतकात, मुंबईत जशा कापड गिरण्या उभ्या राहिल्या आणि मुंबईचे रूप बदलले, वाढ झाली तसेच बेलफास्टचे झाले. 1900 साली आयर्लंडमधली पासष्ट हजार माणसे कापड गिरण्यांत काम करत, त्यातली बहुसंख्य बेलफास्टमध्ये होती. सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सहापर्यंत माणसे तिथे आठवडय़ाचे सहा दिवस राबत. तुटपुंज्या पगारात ते काम करत. विशेषतः बायका गरोदरपणात आणि मुलांच्या जन्मानंतर लगेच कामावर जात. आज आपण पर्यावरण, हायजिनिक कंडिशन्स वगैरे शब्द सतत वापरत असतो. कारण त्याचे महत्त्व जगाला कळलंय. त्यावेळी गिरण्यांसाठी दमट वातावरण लागे. त्यामुळे फुप्फुसाचे रोग जडत. धुळीच्या साम्राज्यामुळे क्षयाचा प्रादुर्भाव होत असे. पाण्यात उघडय़ा पायाने काम करण्यामुळे पायाला रोग होत. शहरवाढीचे हे सर्व दुष्परिणाम होत.

बेलफास्टमध्ये दुसऱया बाजूला गोदीची भरभराट झाली. ‘गोदी’ वाढायला लागल्याबरोबर गोदीसाठी आवश्यक गोष्टींच्या निर्मितीची इंडस्ट्री उभी राहिली. शहर असं वाढतं आणि रोजगार असा उत्पन्न होतो.

बोटी उभारण्याची इंडस्ट्री उभी राहिल्यावर ‘सुंभाची’ गरज लागू लागली. मग ‘सुंभ’ तयार करण्याचे कारखाने उभे राहिले. 1900 सालात नुसत्या सुंभ तयार करण्याच्या इंडस्ट्रीत दोन हजार माणसांना नोकऱया मिळाल्या. चाळीस एकर जमिनीवर पसरलेल्या या कारखान्यात मग अनेक प्रकारचे दोर तयार झाले. शहर वाढते तशा त्या शहराच्या गरजा वाढतात आणि मग वाढणाऱया गरजांसाठी नव्या इंडस्ट्री उभ्या राहतात, नव्याने रोजगार निर्माण होतो. व्हेंटिलेशन आणि पंखे निर्मितीसाठी सॅम्युअल डेव्हिडसनने सिरोको कंपनी उभी केली. ज्या ‘हार्टलॅण्ड ऍण्ड वुल्फ’ कंपनीने टायटॅनिक बोट उभारली त्यांना व्हेंटिलेशन पंखे या ‘सिरोको’ कंपनीने पुरवले.

शहराची वाढ इथेच थांबत नाही. तिथे राहणाऱया माणसांनाही मने असतात. चांगल्या वाईट सवयी असतात. इंग्लंडने जगाच्या ओठात सिगारेट दिली. त्या काळी बेलफास्टमध्येसुद्धा ‘मरे’ आणि गॅलहार या दोन सिगारेट कंपन्या उभ्या राहिल्या. त्या काळात दहा गोल्ड प्लेट सिगारेट्स फक्त तीन पेन्सला मिळत. म्हणजे हिंदुस्थानचे उदाहरण देऊन सांगायचे तर तीन पैशांत दहा सिगारेट्स. बेलफास्टमध्ये सिगारेटचा धूर वाढवणाऱया या कंपनीने सोळाशे माणसांना रोजगार दिला. सिगारेटची भरभराट झाल्यावर व्हिस्की कशी मागे राहील? ‘डनव्हिल’ने बेलफास्ट आणि आयर्लंडला व्हिस्की पुरवण्याचे पवित्र काम केले. 1900 सालाच्या उंबरठय़ावर ही कंपनी देशाबाहेर जाणारी  साठ टक्के व्हिस्की तयार करत होती. स्वतःच्या देशाला नशा दिली ती वेगळीच. इंग्लिश राज्यकर्तेही खूश होते. त्यांना कररूपात रग्गड पैसा मिळत होता.

मुंबईत गिरण्यांमुळे गिरणगाव उभे राहिले. तिथल्या गिरणीत काम करणाऱया कामगारांना तुटपुंजा पगार मिळत असे. त्यामुळे राहण्यासाठी ‘चाळ’ निर्माण झाली. बऱयाचदा एखादी खोली किंवा काही वेळा तुम्ही नशीबवान, सुखवस्तू असाल तर दोन खोल्या हे चाळीचे वैभव होते. बेलफास्टमधल्या कामगारांची स्थिती किंचित बरी होती. त्यांच्यासाठी घरे मिलच्या जवळ बांधली गेली. ती दोन प्रकारची असत. एक किचन हाऊस म्हणजे किचन आणि बेडरूम तळमजल्यावर. पार्लर हाऊसमध्ये छोटय़ा लिव्हिंगरूममुळे जागा किंचित मोठी असे. तिथे आपल्याप्रमाणे चाळी उभारण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे छोटी छोटी घरे उभारली गेली. आज बेलफास्ट किंवा इंग्लंडमध्ये कुठेही राहताना त्या काळात नळाला सदैव पाणी नसे, टॉयलेट बाहेर असत. यावर आज विश्वास बसत नाही. आजची ‘फ्लश टॉयलेट’सुद्धा अस्तित्वात नव्हती. आपल्यापेक्षा फार पुढे नव्हते ते! मुलांनासुद्धा फक्त अर्धवेळ शाळा उपलब्ध होत्या.

मी चाळीत राहतो. त्यामुळे बेलफास्टची वाढ, तिथलं आयुष्य याची मी कल्पना करू शकतो. वाढणाऱया मुंबईतले आणि वाढणाऱया बेलफास्टमधले साम्य मला दिसू शकते. वाढणाऱया मुंबईतले आणि वाढणाऱया बेलफास्टमधले साम्य मला दिसू शकते. दोन्ही तशी बंदरे ब्रिटिशांनीच मोठी केलेली. आज मात्र दोन्ही शहरांत फार काही साम्य नाही. मुंबई कुठच्या कुठे पुढे निघून गेली. मुंबई बहुरंगी-बहुढंगी झाली. बेलफास्ट मात्र अजूनही धार्मिक वेडेपणाच्या खुणा जपत जगतेय. वरून शांत आहे, पण राखेला फुंकर घातली तर निखारे दिसतात.

टायटॅनिक आणि इतर गोष्टींबाबत पुढे एकापाठोपाठ एक!

[email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या