कानड्यांचा येडेपणा! बेळगावात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला, सीमाभागात संतापाचा उद्रेक

886

कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषकांचा किती तिरस्कार करते याचे आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पोलीस बंदोबस्तात कर्नाटकातील भाजप सरकारने रातोरात हटविला. या घटनेमुळे मनगुत्ती गावात तणाव निर्माण झाला असून, सीमाभागासह शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठी भाषकांनी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध केला आहे.

सीमाभागातील मराठी भाषक मनगुत्ती गावात ग्रामपंचायतीच्या ठरावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मोठ्या दिमाखात बसविण्यात आला होता. मात्र, एका गटाने केलेल्या तक्रारीचे कारण पुढे करून बेळगाव जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्री अचानक हा पुतळा हटवला. या घटनेने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली.

कर्नाटकला मराठी भाषकांप्रमाणे शिवरायांचेही वावडे असले तरी मराठी भाषक गप्प बसणार नसल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला आहे. कर्नाटक सरकारने हटविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने उभा करावा, अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील, असा इशारा कोल्हापुरातील नूल गावच्या रहिवाशांनी दिला आहे. शिवाय, सोमवारपर्यंत वाट बघू नाहीतर मनगुत्ती गावात येऊन आंदोलन उभे करू, असा इशारा सीमाभागातील मराठी भाषक गावांनी दिला आहे.

भाजपच्या मनात इतका का द्वेष?
राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेचा निषेध केला. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजपच्या मनात छत्रपती शिवाजी महारांजाबाबत इतका का व्देष आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम फक्त मतांपुरता असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. उदयनराजे भोसले यांनी खासदारपदाची शपथ घेतल्यावर शिवाजी महाराजांचा जयघोष केला. तेव्हा काय घडले हे आपल्याला माहिती आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पुतळ्याची पुनर्स्थापना करा
सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना पत्र पाठवून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या पूर्वपरवानगीने हा पुतळा बसवूनही स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला. कर्नाटक सरकारने संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनस्र्थापना करावी अशी मागणी सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ व माझ्यावतीने करीत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या