जम्मू कश्मीरमधील चकमकीत बेळगावचा जवान शहीद

3920

जम्मू-काश्मीर येथील पूंछ भागात गुरुवारी रात्री दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत राहुल भैरू सुळगेकर (24, रा.मारुती गल्ली, उचगाव, जि.बेळगांव) हा मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान शहीद झाला.

सैनिकी परंपरा असलेल्या घरातून राहुल सुळगेकर हे चार वर्षांपूर्वी सैन्य दलातील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. त्यांचे वडील सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. तर राहुल यांचा मोठा भाऊ मयूर हे देखील सैन्यदलात कर्तव्य बजावत आहेत. सैन्यात झाल्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान राहुल सुळगेकर हे देशाच्या सीमेवर रक्षणासाठी रुजू झाले होते.

जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे बंदोबस्तावर असताना गुरुवारी रात्री दहशतवाद्यांबरोबर चकमक उडाली. या चकमकीमध्ये जवान राहुल सुळगेकर यांना वीरमरण आले. याची माहिती लष्कर आणि प्रशासनाच्या वतीने शहीद जवान राहुल सुळगेकर यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली.

गावचे सुपुत्र दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाल्याचे वृत्त उचगाव येथे येऊन धडकताच, गावावर शोककळा पसरली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत शहीद जवान राहुल यांचे पार्थिव उचगाव येथे पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या