असे आहे एमआय–17 व्ही 5’

एमआय-17 व्ही 5’  या हेलिकॉप्टरचा वापर लष्कर करत असते. रशियन बनावटीचे हे हेलिकॉप्टर अत्यंत सुरक्षित मानले जाते. महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी हवाई दलाकडून या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. महत्त्वाच्या व्यक्तींना या हेलिकॉप्टरमधून नेण्यापूर्वी सुरक्षिततेची बारकाईने पाहणी केली जाते.  हेलिकॉप्टरची स्थिती व देखभाल, हवामान आदींची अनेक वेळा पडताळणी केली जाते. वेळप्रसंगी या हेलिकॉप्टरचा वापर विशेष कारवाईवेळी जवानांना वाहून नेण्यासाठीही केला जातो.

काझान आणि उलन-उडे येथील दोन कारखान्यांमध्ये या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन केले जाते. रशियामध्ये या हेलिकॉप्टरची मालिका ‘एमआय-8 एम’ या नावाने आहे. हे हेलिकॉप्टर कमाल ताशी 250 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. सलग 495 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. सुरक्षेसाठी त्यात दोन टर्बोशाफ्ट इंजिन्स असतात. 18 मीटर लांब आणि 7489 किलो वजनाच्या या हेलिकॉप्टरच्या पंखांची लांबी 21 मीटर इतकी आहे. 13 हजार किलो वजन वाहून नेण्याची क्षमताही त्यात आहे. सुलूर एअरबेसवरून ही हेलिकॉप्टर्स उड्डाणे घेत असतात.

 कोणत्याही वातावरणात रात्रंदिवस उड्डाणाची क्षमता

या हेलिकॉप्टरचे एक वैशिष्टय़ म्हणजे ते कोणत्याही प्रकारच्या हवामानात आणि भौगोलिक वातावरणात उड्डाण करू शकते. दिवसा आणि रात्रीही त्याचा वापर करता येतो. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदतकार्यासाठीही या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.

फक्त एक अपघात झाल्याचा इतिहास

हिंदुस्थानला काही वर्षांपूर्वीच ‘एमआय-17 व्ही 5’ ही हेलिकॉप्टर्स रशियाकडून मिळाली. हेलिकॉप्टर्सची शेवटची बॅच 2018 मध्ये हिंदुस्थानात पोहोचली. सामान, जवान, शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी त्याचा वापर हवाई दल करते. हे हेलिकॉप्टर्स विश्वासू म्हणून गणले जाते. त्यामुळे पंतप्रधानांच्या प्रवासासाठीही त्याचा उपयोग केला जातो. ‘एमआय-17 व्ही 5’ हेलिकॉप्टर्सच्या अपघाताचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत या हेलिकॉप्टरचा केवळ एक अपघात फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू-कश्मीरमध्ये झाला होता. त्याच्या एक दिवस आधीच हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता.

हवाई दलातील अन्य हेलिकॉप्टर्स

एमआय-17 मालिकेतील हेलिकॉप्टर्सशिवाय हिंदुस्थानी हवाई दल ‘चिनूक’ हेलिकॉप्टर्सचाही वापर करते. बोइंग कंपनीच्या या हेलिकॉप्टरचा वापर हिमालयातील उंच पर्वतांवरील लष्करी मोहिमांसाठी अवजड साहित्य व शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी केला जातो. याशिवाय सी-17 ग्लोबमास्टर, इयुशिन-76, एएन-32 विमानांचा वापर केला जातो.

  • ताशी 250 किलोमीटर वेग
  • सलग 495किलोमीटरपर्यंत उड्डाण क्षमता
  • दोन टर्बोशाफ्ट इंजिन्स
  • 18 मीटर लांबी
  • 7489 किलो वजन
  • 13 हजार किलो वजन वाहून नेण्याची क्षमता