
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या बंगळुरू येथील रेस्टॉरंट बॅस्टियनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. रेस्टॉरंटचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱयांविरोधात कब्बन पार्क पोलीस ठाण्यात कायद्याच्या कलम 103 अंतर्गत स्वतःहून दखल घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रेस्टॉरंट रात्री दीड वाजेपर्यंत उघडे होते. बॅस्टियनची मुख्य शाखा मुंबईत आहे. या रेस्टॉरंटच्या उपशाखा पुणे, गोवा आणि बंगळुरूमध्ये आहेत. बॅस्टियन रेस्टॉरंट हे तरुणाईसाठी ओळखले जाते.
बांके बिहारी… व्हीआयपी दर्शनाचा नियम बदलला
वृंदावन येथील प्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरातील व्हीआयपी गेटमधून होणाऱया दर्शनाचा नियम बदलला आहे. याआधी या गेटमधून 30 व्हीआयपी प्रवेश करत होते, परंतु नव्या नियमानुसार आता केवळ 5 व्हीआयपी दर्शन घेऊ शकतील. गोस्वामी समाजातील व्हीआयपींची संख्या कमी केल्याने मंदिरातील सेवेकरी रजत गोस्वामी यांनी नाराजी व्यक्त केली. ही संख्या कमी करणे चुकीचे आहे. या निर्णयाला आम्ही कडाडून विरोध करत आहोत. जर आमच्या समाजाचे केवळ पाच लोक प्रवेश करणार असतील तर प्रशासनाच्याही केवळ पाच लोकांनी व्हीआयपी गेटमधून प्रवेश करावा, असे ते म्हणाले.
1 जानेवारीपासून दिल्लीत भारत टॅक्सी सेवा
केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाकडून दिल्लीत 1 जानेवारी 2026 पासून भारत टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. सरकारी सेवेचा प्रवाशांना एक नवीन पर्याय उपलब्ध होईल, तर दुसरीकडे ओला, उबर आणि रॅपिडो
यांसारख्या खासगी टॅक्सी कंपन्यांना एक नवीन आव्हान असणार आहे. 1 जानेवारीपासून भारत टॅक्सी ऍप डाऊनलोड करता येईल. दिल्लीनंतर गुजरातच्या राजकोट शहरातही ही सर्व्हिस सुरू केली जाण्याची योजना आहे. भारत टॅक्सी सर्व्हिस खासगी कंपनीच्या तुलनेत स्वस्त सेवा असेल, असे बोलले जात आहे.
हिंदुस्थानींना दिलासा, कॅनडामध्ये बिल सी-3 लागू
कॅनडा सरकारने नागरिकत्वाच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. विदेशात जन्माला आलेले आणि दत्तक घेतलेल्या मुलांना कॅनडाचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कॅनडामध्ये 15 डिसेंबरपासून बिल सी-3 लागू करण्यात आले आहे. आई-वडील कॅनडातील आहेत आणि मुले विदेशात जन्माला आले असतील तर अशा मुलांना याचा फायदा होणार आहे. नव्या नियमानुसार, विदेशात जन्माला आलेल्या मुलांना कॅनडात 1095 दिवस राहिल्यानंतर कॅनडाचे नागरिकत्व मिळू शकते. कॅनडामध्ये हिंदुस्थानींची संख्या मोठी आहे. त्यामुळे हिंदुस्थानींना या बदलाचा फायदा मिळेल.


























































