
बंगळुरूच्या सोलादेवनहल्ली परिसरात मारहाणीची घटना समोर आली आहे. कुशल नावाच्या एका तरुणाला 10 ते 12 जणांच्या टोळीने बेदम मारहाण केली. या हल्लेखोरांनी तरुणाला निर्वस्त्र करून मारल्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली आहे. हे इतक्यावरच थांबलं नाही तर, हल्लेखोरांनी तरुणाला मारत असताना त्याचा व्हिडीओ देखील बनवला. सदर प्रकरणाची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुशल आणि त्याच्या प्रेयसीचे नाते संपुष्टात येऊन दोन वर्षे झाली होती. तरीही कुशलने त्याच्या EX गर्लफ्रेंडला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवायला सुरुवात केली. यामुळे तरुणीने तिच्या सध्याच्या प्रियकराला आणि त्याच्या मित्राला याबाबत कल्पना दिली. यानंतर युवतीच्या प्रियकराने कुशलला एका निर्जन स्थळी बोलवले आणि त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
कामाठीपुऱ्यात बांगलादेशी ‘लाडकी बहीण’, क्राइम ब्रँचकडून पाच जणांना अटक
मुलीच्या प्रियकराने त्याच्या इतर मित्रांसह कुशलला पकडून बेदम मारहाण केली. यामुळे त्याच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक जखमा झाल्या आहेत. पुन्हा तरुणीच्या नादी लागलास तर याचे परिणाम वाईट होतील. तसेच तुझा आताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होईल, असेही धमकावले. या प्रकरणी सोलादेवनहल्ली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. यात आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 आरोपी अजूनही फरार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी दिली आहे. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, हा एक गंभीर गुन्हा आहे आणि कायदा हातात घेणे अजिबात योग्य नाही. त्यामुळे सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलीस म्हणाले.