बेस्टच्या विद्युतसह काही विभागात कामगारांना १०० टक्के उपस्थितीचे आदेश

377

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा आणि अन्य काही विभागात १ जुलैपासून १०० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये रोष असून त्यांनी अशा परिस्थितीत ‘सोशल डिस्टन्सिंग’ कसे पाळणार असा सवाल कामगारांनी केला आहे. या बेस्ट प्रशासनाचे प्रमुख या नात्याने बेस्ट महाव्यवस्थापकांनी तोडगा काढावा अशी मागणी बेस्टमधील विविध संघटना आणि बेस्ट समिती सदस्यांनी केली आहे. दरम्यान, बेस्टच्या या निर्णयाविरोधात वडाळा आगारात कामगारांनी मूक निदर्शने करीत आपला निषेध व्यक्त केला आहे.

बेस्ट उपक्रमाने लॉकडाऊन आणि अनलॉकच्या दिवसांत कामावर न आलेल्या कामगारांना चार्जशीट पाठविली होती. तसेच अनेक कामगारांना बडतर्फही केले होते. मात्र, शहरातील ‘रेड झोन’ आणि तसेच प्रतिबंधित क्षेत्रात असलेले नियम आणि उपलब्ध न होणारी वाहने यामुळे अनेक कामगार कामावर पोहचू शकले नव्हते. आता १ जुलैपासून बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा तसेच अन्य काही विभागातील कर्मचार्‍यांना १०० टक्के हजेरी राखण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा निषेध करत इलेक्ट्रिक युनियन, बेस्ट इंजिनियर असोसिएशनसह काही संघटनांनी संघटनांनी मूक निदर्शनेही केली.

बेस्टमध्ये ‘क्यूआर’ कोड आधारित तिकीटप्रणालीची चाचणी

बेस्टमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वाहकाशी प्रवाशांचा कमीत कमी संपर्क यावा यासाठी आता ‘क्यूआर’ कोड आधारित तिकीटाचे पैसे अदा करण्याच्या प्रणालीची चाचणी सुरू आहे. वडाळा आणि कुलाबा आगारात काही मोजक्याच बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली. त्याचा प्रतिसाद चांगला असल्याने या आठवड्यात बेस्टच्या सर्व आगारातील बसमध्ये सुविधा राबविण्यात येणार आहे. बेस्टची दररोजची प्रवासी संख्या ९ लाखांच्याही पुढे गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या