
बेस्टच्या गोरेगाव आगारातील एका कर्मचाऱ्याला कोरोना झाला असल्याचे वृत्त आहे. तर अन्य एका कर्मचाऱ्याच्या नातलगाला कोरोना झाल्याने त्याला क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या वीजपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता बेस्टच्या गोरेगाव आगारातील वाहकाला कोरोना झाल्याचे त्याने बेस्ट प्रशासनाला कळविले आहे. त्याने बेस्ट प्रशासनाला चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे स्वत: कळविले आहे. परंतु त्याचा कोणताही रिपोर्ट अद्याप उपक्रमाकडे सादर झालेला नाही. त्याला केवळ एक दिवस सर्दी खोकला झाला होता, आता त्याची शारीरिक स्थिती नॉर्मल असल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.तसेच दुसरा कर्मचारी त्याचे नातेवाईकच कोरोनाग्रस्त झाले असल्याने त्याला क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या कर्मचार्याला त्याच्या इतर नातेवाईकांसोबत घरापासून दुसरीकडे क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्या कर्मचार्याची चाचणी केली असून रिपोर्ट अजूनपर्यंत उपक्रमाला उपलब्ध झालेला नसल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.


























































