बेस्टच्या खासगी चालकांचा संप संपेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यांपासून थकलेला पगार व पीएफ जमा न केल्याने बेस्टच्या वेटलिजवरील मिनी बसच्या कंत्राटी चालकांनी गेले तीन दिवस ‘काम बंद’ आंदोलन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना टॅक्सी व रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. कुलाबा आगार-5, वडाळा-19, विक्रोळी-32, वांद्रे-55, कुर्ला-46 बसेस सुटू शकल्या नाहीत. बेस्टने स्वतःच्या मालकीच्या 39 जादा फेऱया चालवीत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

वेतन आणि देणी न मिळाल्याने गुरुवारीही कुलाबा, वांद्रे, कुर्ला, विक्रोळी, वडाळा डेपोतील चालकांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू होते. एमपी ग्रूपच्या कंत्राटी चालकांनी हा संप पुकारला आहे. 17 मेपासून खासगी चालकांचे आंदोलन सुरू आहे. बेस्ट उपक्रमाने कंत्राटदारावर चुकविलेल्या प्रत्येक फेरीमागे पाच हजारांचा दंड केला आहे. 17 मे रोजी 163, 18 मे रोजी 308 आणि गुरुवारी 275 बस शेडय़ुलिंगमध्ये असताना प्रत्यक्षात 157 बस आगारातून निघाल्याच नाहीत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या 39 बस सोडून दिलासा दिला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत संपावर तोडगा निघाला नसल्याने उद्याही प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.