
मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीने उद्या रविवार, 17 एप्रिलला सकाळी 7 वाजता भव्य मिनी मॅरेथॉन 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोविड संकटानंतर आयोजित मागाठाणे मॅरेथॉनमध्ये सुमारे 4000 खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली असल्याची माहिती आयोजक सचिन शिर्के यांनी दिली. या स्पर्धेची जोरदार तयारी झाली असून मागाठाणे नगरी सज्ज झाली आहे.
या मॅरेथॉनला उद्या सकाळी 7 वाजता युनिव्हर्सल हायस्कूल, अशोकवन, दहिसर (पूर्व ) येथून मॅरेथॉनचा प्रारंभ विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेवक संजय घाडी, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
असे आहेत धावपटूंचे गट आणि रेसचे अंतर
10 वर्षांखालील (1 किमी), 12 वर्षांखालील (2 किमी), 14 वर्षांखालील (3 किमी) आणि 16 वर्षांखालील (4 किमी) तसेच वयोगट 35 ते 45 वर्षे (एक किमी) आणि वयोगट 45 ते 60 वर्षे (1 किमी) असे या मॅरेथॉनचे भव्य स्वरूप आहे. विजेत्यांना पारितोषिक, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.



























































