गैरहजर राहिल्याने बेस्टने 11 कामगारांना बडतर्फ केले

399
best-bus

लॉकडाऊनमध्ये कामावर हजर‌ न झाल्याने बेस्टच्या 11 कामगारांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये चालक-वाहकांसह अन्य कामगारांचा समावेश आहे. या कामगारांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी बेस्ट समिती सदस्य व कामगार संघटनांनी केली आहे.

लॉकडाऊनमध्ये बेस्ट अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना सेवा देत होती. त्यावेळी अनेक कर्मचारी पहिल्या दिवसापासून ड्यूटीवर गैरहजर राहिले आहेत. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा असल्याचे नोकरीवर लागताना माहिती असतानाही अशाप्रकारे गैरहजर राहिल्याने सेवा देताना अडचणी येत होत्या. पुरेशा मनुष्यबळाअभावी बेस्ट प्रशासनाने नियोजित केलेल्या बस गाड्या सेवेत येऊ शकल्या नाहीत. 3,500 पैकी केवळ 1,600 पर्यंत बसगाड्याच सेवेत आल्या. कर्तव्यावर न आलेल्या चालक-वाहकांना बेस्ट उपक्रमाने कामावर बोलावले होते. तरीही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. 8 जूनपासून नियमित बस सेवा सुरू होऊनही बेस्टच्या 2,700 ते 2,800 पर्यंतच बसगाड्या धावत आहेत. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून चार्जशीटही पाठवून देण्यात आली. चार्जशीट मिळाल्यानंतर परिवहन विभागातील चालक, वाहक व अन्य कर्मचारी कामावर हळूहळू उपस्थित होऊ लागले. परंतु चार्जशीटला काहीच प्रतिसाद न दिल्याने बेस्टमधील काही जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

22 जूनला धारावी, देवनार, दिंडोशी आणि बॅकबे आगारातील 11 जणांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले आहे. या कामगारांनी 13 ते 18 वर्षापर्यंत बेस्टमध्ये सेवा केली आहे. या कामगारांवर एवढी कठोर कारवाई करणे उचित नसून त्यांचे वेतन कपात करणे किंवा निलंबन करणेपर्यंत ठीक होते. कामगार कपात करण्यासाठी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनची वेळ निवडणे अयोग्य असून बडतर्फीची‌ कारवाई मागे घेण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या