बेस्टचा 1887.83 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प, 600 सीएनजी तर 300 इलेक्ट्रिक बसची खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाचा 2021-22 या वर्षाकरिताचा  1887.83 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलल्या सभेत बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी शनिवारी बेस्टचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांना सादर केला. बेस्टचा परिवहन विभाग गेली काही वर्षे तोटय़ात असताना यंदा विद्युत विभागही तोटय़ात गेला आहे. बेस्टने 600 सीएनजी इंधनावरील बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू केली असून 300 इलेक्ट्रिक बसेसही खरेदी करण्यात येणार आहेत.  

बेस्ट उपक्रमाचे सन 2021-22 चे अर्थसंकल्प अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्यात बेस्ट उपक्रमाचे एकूण उत्पन्न 4939.30 कोटी रूपये तर खर्च 6827.13 कोटी रूपये अपेक्षित धरण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने बेस्टला 1887.83 कोटी रूपयांची तुट येणार आहे. बेस्टच्या परिवहन विभागाचे उत्पन्न 1407 कोटी रूपये तर खर्च 3031.24 कोटी गृहीत धरला आहे. त्यामुळे परिवहन विभागाची तुट 1624.24 कोटी रूपये दर्शविण्यात आली आहे. तर विद्युत विभागाचे उत्पन्न 3532.30 कोटी तर खर्च 3795.89 कोटी इतका अंदाजित धरण्यात आला आहे. एवढी वर्षे फायद्यात असलेल्या विद्युत विभागास अंदाजपत्रकात 263.59 कोटीची तूट दाखविण्यात आली आहे. 2021-22 च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाकरीता 446.07 कोटी एवढय़ा रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

दोन वर्षांत अडीच लाख वीज मीटर बदलणार

गेल्या दोन वर्षांत पारंपारिक वीजमीटर बदलून त्याजागी  दोन लाख इलेक्ट्रॉनिक मीटर बसविले आहेत. पुढील दोनवर्षात अडीच लाख मीटर बदलण्यात येणार आहेत. मार्च 2022पर्यंत एक लाख पारंपारिक मीटर बदलण्यात येतील.  छतावरील सौरप्रकल्पांचे ग्रीड एकत्र करण्यासाठी बेस्टने नवीन ऑनलाईन पोर्टलही विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. नव आणि अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

पालिकेकडून आर्थिक अनुदान

बेस्टचे अर्थचक्र बिघडल्याने मुंबई महानगरपालिकेने बेस्टला उर्जितावस्था आणण्यासाठी 1500 कोटीचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यातील 400 कोटी रूपये देण्यात आले. त्यापैकी 500 कोटीचा निधी कोरोना संकटामुळे न देण्याचा निर्णय झाला आहे. तर उर्वरित 600 कोटी निधीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

बेस्टच्या ताफ्यात 600 सीएनजी बसेस

बेस्टच्या ताफ्यात ऑक्टोबरच्या आकडेवारीनूसार एकूण 3875 बसगाडय़ा आहेत. त्यात स्वतच्या मालकीच्या 3337 बसेस आहेत. तर 3000 बस भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत. या शिवाय 300 इलेक्ट्रीक बस खरेदी करण्यात येणार आहेत. तर 600 सीएनजी (सिंगल डेकर) बस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 31 मार्च 2022 पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील एकूण बसची संख्या 6,337 इतकी होणार आहेत.

800 ठिकाणी बसची अपेक्षित वेळ सांगणारे इंडिकेटर्स

विविध बसस्थानके, बसचौक्या व बसथांबे मिळून एकूण 800 ठिकाणी प्रवासी माहिती प्रणाली अंतर्गत प्रवाशांना बससेवेची अपेक्षित वेळ सांगणारे फलक (डिस्प्ले) बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बसगाडीची बसथांब्यावर येणारी अपेक्षित वेळ प्रवाशांना समजू शकणार आहे.

‘वन नेशन वन कार्ड’, स्वयंचलित भाडे आकारणी

केंद्र सरकारने रेल्वे, बस, मोनोरेल, मेट्रो आदीसाठी एकाच स्मार्टकाडद्वारे प्रवासी भाडे आकारणारी ‘एक राष्ट्र एक कार्ड’ ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड या प्रकल्पात बेस्टही सहभागी होत आहे. सदर कार्ड सर्व प्रकाराच्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्राला लागू होणार आहे.  ऑक्टोबर 2020 पासून या योजनेची चाचणी सुरू आहे. या चाचणीनंतर ही योजना प्रायोगिक तत्वावर बेस्टच्या पुलाबा आणि वडाळा आगारात कार्यान्वित होणार आहे.