बेस्टचा ऐतिहासिक वेतनकरार, कामगारांना गुढीपाडव्याची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टच्या सन 2019 ते 2021 च्या वेतन कराराच्या अंतिम मुद्यावर गुरुवारी 8 एप्रिल रोजी सह्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेस्ट कामगारांना भरघोस वेतनवाढ मिळाली असून बेस्ट कामगार सेनेने कर्मचाऱयांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खास भेट दिली आहे. आता बेस्ट कर्मचाऱयांना लवकरच थकबाकीचे प्रदान करण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाला राज्य सरकारने बीआयआर अॅक्टमधून (मुंबई औद्योगिक संबंधी अधिनियम) वगळल्यानंतर बेस्ट कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक वेतन करार करण्यात आला आहे. सर्व भत्ते, सेवासुविधा अबाधित राखून वेतनकरार संपन्न झाला आहे. या करारासाठी 1200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका दरवर्षी बेस्टला 550 कोटी रुपये वेतनाच्या खर्चापोटी देणार आहे.

पाच दिवसांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर सह्या

अखेर पाच दिवस मॅरेथॉन बैठका पार पडून 8 एप्रिल रोजी सन 2016 ते 2021 या वर्षाच्या वेतन करारावर बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रपुमार बागडे, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस धनंजय चौधरी, कार्याध्यक्ष अॅड. उदयपुमार आंबोणकर, उपाध्यक्ष मनोहर जुन्नरे, उमेश सारंग आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात अंतिम स्वाक्षरी होऊन हा वेतनकरार संपन्न झाला. हा वेतनकरार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अथक प्रयत्न आणि परिश्रमामुळे संपन्न झाला आहे.