गीताबोध – दुःख आणि सुख

>> गुरुनाथ तेंडुलकर

मागील लेखात आपण अर्जुनाच्या चित्तवृत्तीत अल्पसा बदल झाल्याचं पाहिलं. `मी युद्ध करणारच नाही.’ या हट्टी भूमिकेतून तो आता थोडासा `जिज्ञासू’च्या भूमिकेत आला आहे. त्याच्या मनात भगवान श्रीकृष्णांनी जी जिज्ञासा निर्माण केली त्यातून त्याने `मला स्थितप्रज्ञाची लक्षणं समजावून सांगा,’ अशी विनंती केल्याचं आपण पाहिलं.

स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणताहेत… 

दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृह। 

वीतराग भयक्रोधः स्थितधी: र्मुनि: रुच्यते।।56।। 

भावार्थ – दुःखात ज्याचे मन उद्विग्न होत नाही आणि सुखाच्या ठायी ज्याला अभिलाषा नाही. ज्याच्या मनातील प्रीती, भय, क्रोध निघून गेले आहेत, त्याला स्थितप्रज्ञ मुनी असं म्हणतात.

आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना तर हे गुण अंगी बाणवणं अगदी अशक्यच वाटेल. कारण आपण सर्वसामान्य माणसं जराशा दुःखाने उद्विग्न होतो. संतापतो, चिडतो, कुढतो, स्वतलाच त्रास करून घेतो. प्रत्येकवेळी आपल्याला सुखच अपेक्षित असतं. दुःख नकोच नको आणि केवळ सुखच सुख हवं अशी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांची अपेक्षा असते.

अनेकदा आपलं सुख आणि दुःख दोन्हीही अगदीच क्षुल्लक गोष्टींवर अवलंबून असतात.  आपल्याला हवा तो संघ क्रिकेटची मॅच जिंकला की, त्यामुळे आपल्याला आनंद होतो. आपल्या आवडत्या नेत्याबद्दल जरा कोणी वाईटसाईट बोललं की, आपण जिवलग मित्रांशीदेखील शत्रुत्व पत्करतो. वास्तविक ज्याच्याशी आपला खऱया अर्थाने फारसा संबंध नसेल अशा घटनादेखील आपल्या सुखाचं किंवा दुःखाचं कारण ठरतात. एवढे आपण कमकुवत आहोत का? दुर्दैवाने याचं उत्तर `होय’ असं द्यावं लागेल.

अशी कमकुवत मनाची माणसं पुढे भावनिक उद्दिपनातून निर्माण होणाऱया अनेक विकारांची शिकार होताना आढळतात. अनेक मनोविकारतज्ञांशी बोलून मी हे मत मांडतोय. अलीकडे तर काही मानसशास्त्रज्ञांकडे येणाऱया मनोरुग्णांच्या बाबतीत आणखीनच एक प्रकार पाहायला मिळतोय.

टीव्हीवर दररोज सुरू असलेल्या बहुतेक सगळ्या मालिकांतून जे काही दाखवलं जातं त्यात प्रेक्षक स्वतला शोधायला लागले आहेत. त्या नायक-नायिकेचं दुःख हे स्वतचं मानून त्यामुळे स्वतची मन:स्थिती बनवू लागले आहेत. अनेक जणांची या मालिकांमुळे झोप उडाली आहे. त्यात दाखवले जाणारे अतिशयोक्तीपूर्ण प्रसंग जणू आपल्याच बाबतीत घडताहेत अशा कल्पनेने प्रेक्षकांपैकी काही कमकुवत मनाच्या व्यक्तीं मनोरुग्ण बनत चालल्या आहेत. अनेक मालिकांतून प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणाऱया प्रसंगाची रेलचेल असते. त्यातली नायक- नायिकेची दुःखं ही आपली स्वतची आहेत अशा कल्पनेतून काहीजण वावरताहेत.

टीव्हीवरच्या काल्पनिक दुःखाने दुःखी होणारी आणि त्यातील अलिशान घरात दाखवल्या जाणाऱया साखरपुडय़ापासून मेहंदी-संगीत-लग्नसमारंभ इत्यादी सोहळ्यात रंगून जणू आपल्याच घरात काही सणवार किंवा मंगलकार्य घडतंय अशा स्वप्नांत रमून आत्मभान विसरणाऱया सामान्यजनांना तर `दुःखेषु अनुद्विग्नमना, सुखेषु विगतस्पृहा’ ही गोष्ट अगदीच खोटीच वाटेल.

असो, पण आपण थोडय़ाशा शांत मनाने विचार केला तर आपल्याला स्वतलाच जाणवेल की, आपल्या आजूबाजूला घडणाऱया अनेक घटना घडणं किंवा न घडणं आपल्या हातात नसतं. त्यामुळे त्याबद्दल उगीच चिंता किंवा हळहळ करून काहीही साध्य होत नाही. तरीदेखील आपण उगाचंच नको तेवढा विचार करून स्वतलाच त्रास करून घेत असतो. टेन्शन्स वाढवून घेतो आणि परिणामी आपल्या आरोग्यावर आणि नातेसंबंधावरदेखील त्याचे विपरित परिणाम होतात. त्यावर उपाय म्हणून भगवान सांगताहेत…

`दुःख काय किंवा सुख काय’ कालचक्रात रात्रीनंतर येणाऱया दिवसाप्रमाणे येणार-जाणार. त्यामुळे दुःख आलं तर त्याबद्दल मन विषण्ण न होऊ देता त्यातून कसा मार्ग निघू शकेल याचा विचार करणं अधिक महत्त्वाचं. सुख आणि दुःख आयुष्यात दोन्हीही अपरिहार्य आहेत. सुखामुळे दुःखाचा विसर पडतो आणि आयुष्य जगायची उमेद मिळते, तर दुःखामुळे सुखाची किंमत कळते.

पण गमतीची गोष्ट म्हणजे माणूस वाटय़ाला आलेलं सुख घटाघटा पिऊन संपवतो आणि दुःख मात्र चोथा झालेल्या च्युइंगमसारखं चघळत बसतो. अनेक जणांना दुःखाचा हा च्युईंगम चघळण्यातच सुख वाटायला लागतं. अशा दुःख कवटाळून त्यातच रमणाऱया माणसांना उद्देशून इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे. `हॅपी बाय बिइंग अनहॅपी.’

खरं तर आपल्या वाटय़ाला आलेलं खरं दुःख (काल्पनिक नव्हेत) ही `भगवंताने घेतलेली परीक्षा’ समजून त्यातून उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करायचे. त्याचप्रमाणे मिळालेल्या सुखाला `भगवंताचा कृपाप्रसाद’ मानून त्याचा स्वीकार करायचा.

`दुःखाने खचून जायचं नाही की, सुखाने हुरळून जायचं नाही.’ हेच ज्ञानी माणसाचं प्राथमिक लक्षण आहे. याच श्लोकाच्या दुसऱया ओळीत म्हटलं आहे की `वीतराग भय क्रोध स्थितधि मुनी उच्यते।’

ज्याच्या मनातील राग, (संस्कृत भाषेत राग म्हणजे आसक्ती) भीती आणि क्रोध नाहीसा झाला त्याला मुनी असं म्हणतात.

हा श्लोक भगवंतांनी अर्जुनाला सांगण्याचं कारण म्हणजे अर्जुनाच्या मनात आप्तस्वकीयांबद्दल आसक्ती होती. त्यांना मारल्यामुळे आपल्याला पाप लागेल ही भीती होती. त्याचप्रमाणे त्याच्या मनात कौरवांनी पांडवांच्या विरुद्ध केलेल्या दुष्कृत्यांबद्दल क्रोध आणि संतापही होता. ( जर अर्जुनाच्या मनात क्रोध नसता तर तो युद्धभूमीवर आलाच नसता.) भगवान सांगताहेत की, या सगळ्या भावनांच्या कल्लोळातून बाहेर पडून केवळ कर्तव्य म्हणून युद्ध कर.

स्थितप्रज्ञाची ही प्राथमिक लक्षणंदेखील आपल्यासारख्या सामान्य माणसांना अंगी बाणवणं किती कठीण आहे हे मी स्वत जाणतो. तरीही किमान काल्पनिक सुखदुःखातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू सरावाने पुढच्या पुढच्या गोष्टी नक्कीच जमतील.