
सामना ऑनलाईन । नगर
नगर जिल्हयासाठी वरदान ठरलेल अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण रविवारी भरले आहे. दुपारी एक वाजता धरण पुर्ण क्षमेतने भरले असून धरणातून ८०० क्युसेक वेगाने प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रविवार असल्याने भंडारदऱ्याचे निसर्गरम्य सौंदर्य पाहण्यासाठी हा परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे.
दरवर्षी १५ऑगस्ट दरम्यान हे धरण भरत असते. मात्र यंदा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तीन दिवस अगोदरच भरलं आहे. भंडारदरा धरणात अजूनही पाण्याची आवक होत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. सालाबाद प्रमाणे सुरक्षेसाठी ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणीपातळी ९.१७ टीएमसीवर स्थिर ठेवण्यात आली होती. रविवारी धरण भरल्याचे पाटबंधारे विभागाकडून तांत्रिकदृष्ट्या जाहीर केले आहे.
नाशिक, ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या आणि सह्याद्री डोंगराच्या कुशीत असलेल्या भंडारदरा धरणाचा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होतो. धरण भरल्यावर त्यातील पाणी निळवंडे धरणात आणि पुढे जायकवाडीसाठी सोडले जाते. त्यामुळे नगरसह मराठवाड्यातील लोकांचे या धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष लागलेले असते. धरण परिसर आणि आजूबाजूचे धबधबे पाहण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. यंदा धरण लवकर भरल्याने आणि सुट्टी आल्याने परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे.

































































