भांडुप परिमंडळात महावितरण मालामाल! दहा लाख 55 हजार ग्राहकांनी वीज बिलापोटी भरले 300 कोटी

865

लॉकडाऊननंतर भांडुप परिमंडळात महावितरण मालामाल झाले आहे. येथील दहा लाख 55 हजार ग्राहकांनी गेल्या दहा दिवसांत तब्बल 300 कोटी रुपयांच्या वीज बिलाचा भरणा केला आहे. महावितरणने वाढीव वीज बिले पाठवल्याची ग्राहक तक्रार करत आहेत. त्यामुळे थकीत वीज बिलाची वसुली होणार का अशी चिंता महावितरणला सतावत होती. तरीही ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात वीज बिलाचा भरणा केल्याने आर्थिक चणचणीचा सामना करणाऱया महावितरणला मोठा दिलासा मिळणार आहे.

महावितरणच्या भांडुप परिमंडळात एकूण 26 लाख वीज ग्राहक असून त्यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या सुमारे 21 लाख एवढी आहे. जूनमध्ये त्यांना सुमारे पाचशे कोटी रुपयांची बिले वितरित केली होती. मात्र ग्राहकांच्या वाढीव वीज बिलाबाबतच्या तक्रारी पाहता थकीत बिलाची वसुली होणार का असा प्रश्न होता. त्याची दखल घेत महावितरणने राज्यभर वीज बिलातील त्रुटी दूर करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मोहीम सुरू केली होती. त्यामुळे तक्रारींचे निराकरण होताच ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी भांडुप परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे पाचशे-साडेपाचशे कोटी रुपये एवढी मोठी रक्कम असतानाही दहा दिवसांत 60 टक्के वसुली झाल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या