संपात सहभागी होणाऱया शासकीय-निमशासकीय कर्मचाऱयांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी उद्या 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याची नोटीस सरकारला दिली आहे. त्या अनुषंगाने उद्या होणाऱया लाक्षणिक संपात सहभागी होणाऱया शासकीय-निमशासकीय कर्मचाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

कर्मचाऱयांसाठी काढण्यात आलेल्या या परिपत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱयास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे संपात सहभागी होणाऱया कर्मचाऱयांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण राज्य सरकारही अनुसरत आहे. याकडे सर्व शासकीय कर्मचाऱयांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र ही संघटना सहभागी आहे. संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा सर्व सरकारी कर्मचाऱयांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या