बीकेसीच्या भारत डायमंड बोर्सच्या कार्यालयाचे भाडे 500 रुपये चौरस फुटावरून 300 रुपये चौरस फूट करण्यात यावे, अशी मागणी करत हिरे व्यापारी भाडेकरूंनी नुकतेच भारत डायमंड बोर्सच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र भाडेकरूंची ही मागणी अवाजवी असून भाडेकरूंच्या दबावतंत्रापुढे भारत डायमंड बोर्स झुकणार नाही, असे हिरे बाजारतज्ञ हार्दिक हुंडिया यांनी स्पष्ट केले.
हिरे बाजारातील तज्ञ हार्दिक हुंडिया म्हणाले, एकीकडे हिरे बाजारात प्रचंड मंदी आहे, तर दुसरीकडे हिरे व्यापाऱयांनी शेअर बाजारमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून भरपूर रुपये कमावले आहेत. सीवीडी हिऱयांची परिस्थिती अधिक बिकट आहे. भाडेकरूंच्या मागणीबाबत हार्दिक हुंडिया म्हणाले, 500 रुपये प्रतिफूट चौरस दरासाठी 5 वर्षांचा लॉकिंग पिरियड आहे. त्यामुळे तुम्हाला भाडे जास्त वाटत असेल तर तुम्ही एखादे छोटेसे कार्यालय घेऊ शकता. भारत डायमंड बोर्सचे सदस्य असाल तर तुम्ही एस.जी. झवेरी हॉलमध्ये बसून भाडय़ाशिवाय व्यवसाय करू शकता. आजही अनेक लोक 500 ते 700 रुपयांपर्यंत भाडय़ाने कार्यालय घेण्यास तयार आहेत, मग व्यापारी संस्थेचे नुकसान का, असा सवाल हुंडिया यांनी विचारला. तुम्हाला सुरतच्या हिरे बाजाराचा पर्याय खुला आहे. परंतु तुमच्या दबावतंत्राचा भारत डायमंड बोर्सवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही हुंडिया म्हणाले.