स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार, अशासकीय ठरावावर सरकारचे आश्वासन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी अद्वितीय योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आज विधानसभेत राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नियम 106 अन्वये यासंदर्भात अशासकीय ठराव मांडला होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता लढा देऊन, त्यासाठी काळय़ा पाण्याची शिक्षा भोगून जनतेला मातृभूमी प्रेमाची ज्वलंत विचारसरणी देणारे आणि क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा, अशी शिफारस विधानसभेने शासनाला करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह देशभरातील प्रमुख नेत्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी सातत्याने केली. सावरकर हे आमचे दैवत आहे असे उद्धव ठाकरे अभिमानाने आणि जाहीरपणे सांगतात. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही तशी भावना व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी आपल्या भाषणांतून याबाबतचा उल्लेख केला होता. तसेच भाजपने आपल्या जाहीरनाम्यातही अनेकवेळा याबाबत आश्वासन दिल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

त्यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले, 2018 आणि 2019 मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची आग्रही मागणी केली होती. यापुढेदेखील या मागणीसाठी  राजशिष्टाचार मंत्री म्हणून मी स्वतः केंद्राकडे पाठपुरावा करेन. त्यामुळे  मुनगंटीवार यांनी अशासकीय ठराव मागे घ्यावा, अशी विनंतीही रावल यांनी केली.