भारतीय कामगार सेनेचा दणका; इंडिगो व्यवस्थापन नमले, संप यशस्वी

मुंबई विमानतळ येथील इंडिगो एअरलाइन्सला सेवा पुरवणाऱ्या एजाईल एअरपोर्ट सर्व्हिस प्रा.लि. कंपनीतील कामगारांनी व्यवस्थापनाकडून होणाऱ्या मानसिक छळाविरोधात गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू केलेल्या संपाला भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे मोठे यश मिळाले आहे. व्यवस्थापनाने कामगारांच्या सर्व मागण्या आज मान्य केल्या असून संप यशस्वी ठरला आहे.

एजाईल एअरपोर्ट सर्व्हिस कंपनीतील कामगारांचा छळ करणाऱ्या व्यवस्थापनाला भारतीय कामगार सेनेने दणका दिला. त्यामुळे व्यवस्थापन वठणीवर आले असून कामगारांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, आमदार अ‍ॅड. अनिल परब, कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम, दिलीप जाधव व चिटणीस मनोज धुमाळ, योगेश आवळे, संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस विजय शिर्पे, मिलिंद तावडे, संजीव राऊत, विनायक शिर्पे यांनी आंदोलन यशस्वी केले.

या मागण्या मान्य
यापुढे कोणत्याही कामगाराला मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार.
भारतीय कामगार सेनेला मान्यताप्राप्त युनियन म्हणून व्यवस्थापनाद्वारे मंजुरी व कामगारांचा पगारवाढीचा सामंजस्य करारदेखील भारतीय कामगार सेनेसोबत करणार.
कामाच्या पद्धतीबाबत घ्यावयाचे निर्णय हे कर्मचारी व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी असलेल्या संयुक्त समितीमार्फत घेतले जाणार.
या वर्षी होणारी तात्पुरती पगारवाढ थकबाकीसह येत्या महिन्यात देण्यात येणार.