कामगारांची पिळवणूक करणाऱ्या पुण्यातील हॉटेल हयात रिजेन्सीच्या मॅनेजमेंटला भारतीय कामगार सेनेने चांगलाच दणका दिला. भारतीय कामगार सेनेच्या दणक्यानंतर हॉटेलचे मॅनेजमेंट ताळ्यावर आले असून कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील हॉटेल हयात रिजेन्सीच्या मॅनेजमेंटकडून कामगारांची पिळवणूक करण्यात येत होती. याबाबत भारतीय कामगार सेनेकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा दखल घेतली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष अजित साळवी आणि सरचिटणीस सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेने हॉटेल हयात रिजन्सी पुणे येथे धडक देऊन कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. तत्पूर्वी कामगारांचे प्रश्न सोडविले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल त्याची पूर्ण जबाबदारी हॉटेल व्यवस्थापनाची असेल, असा इशारा चिटणीस मनोज धुमाळ यांनी दिला होता.
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर हॉटेलचे मॅनेजमेंट ताळ्यावर आले असून मनोज धुमाळ यांच्यासोबत चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या. या वेळी हॉटेल व्यवस्थापनाकडून जनरल मॅनेजर रामनदीप मारवाह, एचआर हेड तेजस चंदपुरे तसेच भारतीय कामगार सेनेचे चिटणीस योगेश आवळे, युनिट अध्यक्ष उदय जाधव, सेक्रेटरी गणेश कुंभार, खजिनदार हेमंत तुपे यांच्यासह कामगार उपस्थित होते.