विकासासाठी गेलो असे म्हणता, तर तुमची विकासाची व्याख्या काय? मिंधेकडे जाणाऱ्यांना भास्कर जाधवांचा सवाल

गुहागरमधील शिवसेनेच्या (उद्धव बाळासेहब ठाकरे) काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते,आमदार भास्कर जाधव यांनी एक जाहीर पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून भास्कर जाधवांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच आम्ही विकासासाठी गेलो, असे मिंधेकेड गेलेले लोकं सांगतात, मात्र, त्यांची विकासाची व्याख्या नेमकी काय आहे? असा सवाल केला आहे. मोकळी वाट करुन दिली आहे. स्वतःशी खोटं बोलत ते जनतेची फसवणूक करत आहेत. असे कितीही लोकं गेले तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही. 40 वर्ष मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन. मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे आफली माणसं दुसरीकडे चुकीच्या दिशेला गेली तर दुःख होणारच, असेही ते म्हणाले. गुहागरमधील शिवसेनेच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांनी लिहिलेल्या पत्रात हा उल्लेख आहे.

अजून माझी आमदारकीची चार वर्ष बाकी आहेत, याची जाणीव स्वकीयांना नसली तरी विरोधकांना नक्की आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढायची माझ्यात धमक आहे. जे गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासाकरता गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असं सांगत आहेत. थांबा, घाई करू नका, असे सांगत आहेत. मी 40 वर्षे राजकारण करतो. त्यामुळे एक कार्यकर्ता गेला तर मी आणखी चारजण निर्माण करु शकतो, असे सांगत भास्कर जाधव यांनी त्यांना ठणकावले आहे.

भास्कररावांवर आमचा राग नाही, मतदारसंघाचा व आमच्या भागाचा विकास हा भास्करराव यांनीच केला, कोट्यवधीचा निधी हा भास्कररावांच्या माध्यमातूनच आला…’ ही वाक्य व ही भाषा आहे गेल्या काही दिवसात पक्ष सोडून गेलेल्या लोकांची, आणि मग जाण्याचं कारण काय सांगतात तर आम्हाला सत्तेत जायचे आहे,आम्हाला विकास करून घ्यायचा आहे. मला हा विषय तुम्हा सर्वांशी बोलावासा वाटला, ज्या विकासाचे कारण देऊन तुम्ही अन्य पक्षात गेल्याचे स्वतःचे समर्थन करताय म्हणजेच स्वतःशी खोटं बोलून जनतेची फसवणूक करत आहात, यांची विकासाची नक्की व्याख्या काय? कोणता शाश्वत विकास यांना अपेक्षित आहे? स्पष्टपणे एखाद्या विशिष्ट कामाचा उल्लेख यांच्याकडून ऐकलात का आपण? बांधवानो- भगिनींनो, धादांत खोटं बोलून केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हा पक्षप्रवेश झाला आहे, हे तुमच्या लक्षात असूदे..

हे सगळं तुम्हाला माहित नाही का? शंभर टक्के तुम्हाला तुम्हा सगळ्यांना याची जाणीव आहे. मग मी परत याची उजळणी आज का करतोय? मित्रांनो, मी पण माणूस आहे, मला पण मन आहे. वेदना होतात मनाला… राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही. 40 वर्ष मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन. परंतु मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे, एवढी वर्ष जीवाभावाप्रमाणे जपलेली माणसं घर सोडून जातात तेव्हा दुःख तर होणारच ना?

जे गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासाकरता गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असं सांगत आहेत. थांबा, घाई करू नका. यापूर्वी जे गेले त्यांनी विकासाकरता किती पैसे आणले ? आणि कोणता विकास केला? हे जरा तपासून बघा. आणि आता जे गेलेत ते विकासाकरता किती पैसे आणणार आहेत? नक्की कोणता व कोणाचा विकास करणार आहेत? हेही जरा अनुभवा आणि पहा. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कसल्याही भूलथापांना बळी पडू नका, यांच्या खोटेपणाच्या नादी लागू नका, विकास विकास काय घेऊन बसलात तुमचा भास्कर जाधव खंबीर आहे,असेही ते म्हणाले.