भिडेवाडा बचाव मोर्चाने शहर दणाणले ; माळी समाजाचा परळीत भव्य मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात काढून बहुजन समाजातील मुली- महिलांना ज्ञान देण्याचे महान कार्य सुरु केले तो भिडेवाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या भिडेवाड्यास शासनाने जागतिक दर्जाचे स्मारक घोषित करावे या मागणीसाठी सोमवारी परळीत भिडेवाडा बचाव समन्वयक समितीने काढलेल्या मोर्चात माळी समाज व फुले प्रेमी,महिला व पुरुष मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरु केली या शाळेच्या माध्यमातून बहुजन समाजातील स्त्रियांमध्ये भिडे वाड्याकडे आजपर्यंत शासनाने दुर्लक्ष केले आहे. बिल्डरकडून भिडेवाडा नष्ट करून त्या ठिकाणी मोठी इमारत उभा करण्यचा डाव आखला जात आहे. मात्र ज्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील स्त्रियांची पहिली शाळा काढली आणि तेथूनच बहुजन महिलांमध्ये ज्ञानज्योत पेटली अशा महान कार्य घडलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या वाड्याला शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा करावी आणि जागतिक दर्जाची ऐतिहासिक वास्तू म्हणून निर्माण करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

भिडेवाडा बचाव हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समन्वयक समिती मोर्चा यशस्वी करण्यासाठी दोन महिन्यांपासून गावोगाव जाऊन माळी समाज व फुले प्रेमींना आंदोलन विषयीची माहिती दिली. त्यात संघर्ष समितीला यश आले असून श्री संत सावता महाराज मंदिर येथून सकाळी निघालेल्या मोर्च्याने भिडेवाडा बचाव या जयघोषाने परळी शहर दणाणून गेले होते. तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येत निघालेला हा मोर्च्याने शांतता व स्वच्छतेचा संदेश दिला. ढोल ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान या मोर्च्यास अनेक राजकीय,सामाजिक पक्ष संघटनांनी पाठिंबा जाहीर करून अनेक पदधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता.