मंडणगड तालुका मुख्य सरकारी आस्थापनांच्या कार्यालयाची बहुसंख्ये कार्यालये असलेल्या भिंगळोली स्मार्ट ग्राम पंचायतीला आपल्या कार्यक्षेत्रातील हद्दीतील कचरा समस्येचे निराकरण करण्यास पूर्णपणे अपयश आल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यमानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली हद्दीतून दापोली तालूक्याकडे जाणारा महत्वाचा मार्ग आहे. याच मार्गावरून खेड तालूक्यातही जाता येते अशा या महत्वाच्या मार्गावर भिंगळोली या महसुली गावाची एक स्मशानभूमी आहे. या समशानभूमीकडे जाणा-या मार्गावर भिंगळोली हद्दीतील कचरा टाकण्यात येतो त्यामुळे कच-याच्या दुर्गंधीचा त्रास हा भिंगळोली गावात राहणा-या काही रहीवाशांना सोसावा लागतोच आहे मात्र त्यापेक्षा कच-याच्या दुर्गंधीचा अधिक त्रास हा दापोली खेडकडे जाणा-या प्रवाशांना अधिक सोसावा लागतो. येथून प्रवास करताना नाकावर हात धरूनच प्रवास करावा लागतो. शिवाय समशानभूमीत जाताना हाच कचरा अडचणीचा ठरत आहे. स्मार्ट ग्राम पंचायतीला आपल्या हद्दीतील कच-याचे नियोजन अजूनही करता आलेले नाही त्यामुळे त्याचा नाहक त्रास हा सर्वांनाच सहन करावा लागत आहे.
मंडणगड तालुका शहराच्या बाजूला लागूनच भिंगळोली हे गाव आहे. याच भिंगळोली गावात तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, ग्रामीण न्यायालय, ग्रामीण रूग्णालय, मंडणगड एस.टी. आगार आदी विविध सरकारी आस्थापनांची कार्यालये आहेत. तसेच सर्वाधिक अधिकारी हे याच भिंगळोली गावात वास्तव्य करत असल्याने या भिंगळोली गावाचे तसे महत्व अधिकच आहे. असे असताना सरकारी आस्थापनांच्या गावातच जर स्वच्छतेची एैसी की तैसी असेल तर मग इतर गावांचा विचारच न केलेला बरा. असे येथील परिस्थिती पाहील्यावर कोणालाही सहज वाटेल. त्यामुळे सरकारी स्वच्छतेच्या वा स्मार्ट ग्राम सारख्या योजना राबवताना दिव्याखाली अंधार नको त्यासाठी सर्वप्रथम प्राधान्याने भिंगळोली गावातील अस्वच्छतेचा प्रश्न निकाली निघाला पाहीजे. मंडणगड तालूका ठिकाणाच्या सरकारी आस्थापनांची कार्यालये याच भिंगळोली गावात असल्याने या गावातील स्वच्छतेचे अनुकरण करतच तालूक्यातील अन्य गावे ही येथील स्वच्छतेचा धडा घेवून त्याचे अनुकरण करतील.
भिंगळोली ग्राम पंचायतीकडे कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी आहे. मात्र स्थानिक कारभार पाहणा-या ग्राम पंचायतीने अधिक लक्ष देवून रहीवाशांसह या हद्दीतून प्रवास करणा-या कोणाही प्रवाशांच्या आरोग्याच्यादृष्टीने कचरा संकलन करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहीजे. उघडयावर वा कोणाला त्रास होईल अथवा कच-याच्या दुर्गंधीने डासांचा प्रसार होणार नाही याची खबरदारी भिंगळोली ग्राम पंचायतीने घ्यायला हवी.
























































