धक्कादायक! मुंबई-ठाणेकरांच्या नाकाला परदेशात वापरलेले मास्क लावण्याचा डाव

4177

कोरोनामुळे संपूर्ण जगभर खळबळ उडाली असून हिंदुस्थानातही या राक्षसी रोगाने शिरकाव केला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार सुरू झाला असतानाच कोरोनाच्या दहशतीचा फायदा घेत परदेशात वापरलेले मास्क मुंबई व ठाणेकरांच्या नाकाला लावण्याचा भयंकर डाव भिवंडीत उघडकीस आला आहे. हे वापरलेले लाखो परदेशी मास्क धुऊन पुन्हा पॅकिंग करण्याचे काम एका गोदामात सुरू असतानाच गावकऱ्यांनी पोलिसांसह छापा मारल्याने या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला आहे.

भिवंडी शहर गोदामपट्टा म्हणून ओळखले जाते. वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंडमध्ये एका गोदामात धुतलेल्या माक्सचे पॅकिंग सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. आपला भंडाफोड होईल या भीतीने रातोरात या मास्कचा साठा पूर्णा गावातील पाईपलाईन शेजारी असलेल्या कचऱयात फेकून दिला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच आज सकाळी तातडीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेगे, नारपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली. कचऱयात फेकलेले सर्व मास्क तातडीने जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व मास्क मुंबईत विक्रीसाठी नेणार होते.

सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणाऱया या घटनेची पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी लगेच दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱयांना संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. दरम्यान मास्कचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे. जप्त केलेले मास्क कोणी आणले, कुठून आणले याचीदेखील सखोल चौकशी होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.

शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याची तत्परता
परदेशातील मास्क रस्त्यावर फेकून दिल्याची माहिती समजताच शिवसेनेचे भिवंडी पंचायत समिती सदस्य विकास भोईर व त्यांच्या सहकारी ग्रामस्थांनी तत्परता दाखवून हा डाव उधळून टाकला. भिवंडीत भंगाराची अधिक गोदामे असून या गोदामांची पोलिसांनी कसून चौकशी करावी व आणखी कुठे परदेशात वापरलेले मास्क ठेवले आहेत काय याचा शोध घ्यावा, अशी मागणीदेखील भोईर यांनी केली आहे.

…तर भलत्याच रोगाचा प्रसार झाला असता
परदेशी मास्कची वेळीच माहिती मिळाल्याने ते जप्त केले. पण त्याचा पर्दाफाश झाला नसता तर हे वापरलेले मास्क लोकांनी नाकाला लावले असते आणि भलत्याच रोगाचा प्रसार झाला असता. ठाणे जिल्ह्यात अद्यापि कोरोनाचा शिरकाव झाला नसला तरी मास्क विकत घेताना ते नवीन असल्याची खात्री करा, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेगे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या