भिवंडी-मनोर मार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठेकेदाराने सुरक्षेच्या उपायाकडे दुर्लक्ष केल्याने अपघात वाढले

भिवंडी-वाडा-मनोर या मुख्य मार्गाचे काम सुरू असताना ठेकेदार कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. दुचाकी घसरून अवजड वाहनांखाली सापडल्यामुळे तीन तरुणांना वेगवेगळ्या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

भिवंडी-वाडा-मनोर मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे काम सुरू असताना कोणतेही सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षेची साधने मार्गावर लावण्यात आलेली नाहीत. या निष्काळजीपणामुळे खुपरी परिसरातील पिक येथील पाटील कुटुंबातील एका २५ वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावर खोदकामामुळे दुचाकी घसरून तो थेटट्रेलरखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. याचप्रमाणे मुसारणे फाटा येथे एका दुचाकीस्वाराचा ट्रेलरखाली अपघात होऊन त्याचा पाय कापला गेला. तसेच गांधरे येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रस्ता पूर्णतः खोदलेला असताना कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने सुमित तरे (२३) या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत तीन तरुणांनी अपघातात आपला जीव गमवल्याने परिसरातून ठेकेदार कंपनीच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वारंवार सूचना देऊनही कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केला आहे. या मार्गावर घडलेल्या अपघातांना ईगल इन्फ्रा इंडिया प्रा. लि. कंपनीचे सर्व संचालक, व्यवस्थापक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल न झाल्यास येत्या आठ दिवसांत कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला आहे.