
भिवंडी महापालिकेच्या एकाच खात्यात वर्षानुवर्षं ठाण मांडून बसलेल्या ७४ कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांनी बदल्या केल्या आहेत. या घाऊक बदल्यांमुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. या बदल्यांना नियमित कामाचा भाग असे प्रशासन सांगत असले तरी प्रशासन वेगवान करण्यासाठी या बदल्या केल्या असल्याची चर्चा आहे.
भिवंडी महानगरपालिकेत लिपीक पदावर कार्यरत असलेले अनेक कर्मचारी गेल्या ८ ते ९ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत होते. याबाबत नागरिक, पदाधिकारी, समाजसेवकांनी आयुक्तांकडे तक्रारी दिल्या होत्या. लिपीक वर्षानुवर्षं एकाच टेबलवर किंवा विभागात काम करीत असल्याने त्यांच्या कामामध्ये एक साचेबद्धपणा आला होता. कोणतीही नवीन कल्पना राबविली जात नव्हती. याची दखल घेऊन आयुक्त अनमोल सागर यांनी २०१७सालापासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या ७४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अचानक झालेल्या बदल्यांमुळे पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.