भिवंडी पालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे संजय म्हात्रे बिनविरोध

भिवंडी महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाच्या 7 एप्रिल रोजी होणाऱया निवडणुकीत  शिवसेनेचे संजय म्हात्रे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध झाली. त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा बुधवारी होणार आहे. भिवंडी पालिकेत कोणार्क विकास आघाडी भाजपा काँग्रेस बंडखोर यांची सत्ता असताना तिजोरीच्या चाव्या मात्र काँग्रेस-शिवसेना या विरोधी पक्षांकडे  गेल्या आहेत.

सप्टेंबर 2020 मध्ये स्थायी समिती सभापती मुदत संपल्या नंतर तब्बल सहा महिने ही निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यामुळे स्थायी समितीच्या सभा होत नसल्याने अर्थसंकल्प ही आयुक्तांनी थेट महासभेला सादर केला होता.तर नगरसेवक अरुण राऊत यांनी स्थायी समिती सभापती निवडणूक घेत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती.

स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य असून काँग्रेस – 8, शिवसेना -2, भाजप – 4, कोणार्क विकास आघाडी -2 असे  पक्षीय बलाबल असून काँग्रेस-शिवसेना सार्वत्रिक निवडणुकी पासून एकत्रित असल्याने त्यांचे वर्चस्व स्थायी समितीवर सुरुवातीपासून राहिले आहे. शिवसेनेचे संजय म्हात्रे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावर काँग्रेस व बंडखोर काँग्रेस गटातील नगरसेवकांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षऱया केल्या आहेत. दरम्यान येत्या बुधवारी 7 एप्रिल रोजी दुपारी 12 वा स्थायी समिती पदाची  निवडणूक होणार आहे. त्यामध्ये औपचारिक घोषणा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या