भुलाबाई आणि भुलोबाची कहाणी!!

आसावरी जोशी,[email protected]

भोंडला… भुलोबा.. भुलाबाई… संपूर्ण महाराष्ट्राचा हा लोक उत्सव खास नवरात्रात साजरा केला जातो… काय आहे भुलाबाई-भुलोबाची गोष्ट… नवरात्रात उतरलेल्या देवीतत्त्वाचे सुंदर… लडिवाळ रूप…
एकदा आदीमाय पार्वती आणि महादेव सारीपाट खेळायला बसले… खेळ अतिशय रंगात आला… प्रत्येक दान पार्वतीआईच्या बाजूने पडू लागलं… आणि सरतेशेवटी तीच खेळात जिंकली… तसे महादेव रुसले आणि तिथून निघून गेले. देवीने भिल्लणीचे रूप घेतले… आणि त्यांना शोधू लागली. देवांनीही भिल्लरूप धारण केले होते… देवीने महादेवांचा रुसवा काढला आणि दोघंही हिमालयातून थेट महाराष्ट्रात आले… विदर्भात… या भिल्ल दांपत्याचा खास वैदर्भीय बोलीत अपभ्रंश झाला… भिल्लणीची झाली भुलाबाई… आणि भिल्लाचे भुलोबा…

महाराष्ट्रातील या भूमीत आदीमाया नेहमीच हक्काने… आनंदाने… हौसेने माहेरपणाला येते. गणेशबाळापाठोपाठ येते ती जेमतेम दोन दिवस… तेही त्याच्या काळजीने… आठवाने व्याकुळ होऊन… पण यावेळी मात्र महादेव आणि ती भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत जोडीने महाराष्ट्रातील घरोघरी विशेषतः विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात ऐसपैस मुक्कामी येतात… आणि खऱया अर्थाने महिनाभर घराघरात भोंडल्याचा खेळ मांडला जातो. यथासांग भुलाबाई-भुलोबाची पूजा केली जाते… शेजारपाजारच्या मुली गोळा होतात… भुलाबाईसमोर गाणी म्हणतात… जणू एकमेकींच्या मनीचे सुख-दुःख भुलाबाईबरोबर वाटून घेतात.

अतिशय उत्सवप्रिय आपण मराठी माणसं… तितकीच सृजनशील… सर्जनशील. या लाल-काळ्या मातीत जे पिकतं… उगवतं… त्यात रमतो. त्याचाही उत्सव साजरा करतो… आदीमाया पार्वतीलाही याच सर्जनाची… काळ्या मातीची ओढ… त्यामुळे तीही आसूसून हक्काने आपल्याकडे येत राहाते. माहेरपणाचे सारे कोडकौतुक आनंदाने पुरवून घेते.

भोंडला

अश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते आणि छोटय़ा मुलींच्या आनंदाला उधाण येते. हे दिवसच खूप आनंदाचे… फळण्याचे… फुलण्याचे. आपल्या मातीतील शेती आणि लोकजीवन, लोकसंस्कृती या एकमेकांना फार पूरक आहेत. आपल्या कृषी आणि पर्यायाने लोकसंस्कृतीची श्रीमंती फार अनोखी आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, दख्खन, मावळ, प. महाराष्ट्र या सर्व प्रांतांमध्ये शेतीची, मातीची श्रीमंती वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण असते.

भुलाबाई आणि भुलोबाचा हा सण, हा खेळ पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात भोंडला म्हणून खेळला जातो… नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱयाच्या दिवशी हा खेळला जातो. घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडल्याचा मांड मांडतात.

एका पाटावर धान्याने हत्ती काढून त्याची पूजा करतात. या हत्तीला हस्त नक्षत्राचे प्रतिक मानतात. कारण हत्ती म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी. पाटावर काढलेल्या हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून छोटय़ा मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात. जिच्या घरी भोंडला असतो तिची आई खिरापत करते. नवरात्रीचे नऊ दिवस हा खेळ चालतो. त्यामुळे रोज वेगळे घर… वेगळी खिरापत. पश्चिम महाराष्ट्रात कोकणात जरी भोंडला फक्त नऊ-दहा दिवसांचा असला तरी या खेळाची खरी रंगत येते विदर्भ, खानदेशात…

विदर्भातील भुलाबाई, भुलोबा

विदर्भात साजरा होणारा हा उत्सव भुलोबा आणि भुलाबाईच्या नावानेच ओळखला जातो. आदीमायेने, काळ्या आईच्या हातून भरभरून आशीर्वाद दिलेला असतो. या नवीन आलेल्या धान्याच्या पुजनासाठी सज्ज असतात. भाद्रपद पौर्णिमेला हा सण सुरू होऊन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा सण साजरा होतो. भुलाबाई आपल्या गणेशबाळासह, भुलोबाला घेऊन माहेरपणाला आलेली असते.

खिरापत

रोज संध्याकाळी सगळ्या मुली एकत्र गोळा होऊन, एकमेकींच्या घरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक गाणी म्हणतात. या गाण्यांनंतर भुलाबाईचा प्रसाद वाटला जातो. येथेही त्याला खिरापतच म्हणतात. भुलाबाईच्या या नैवेद्यामध्ये रोज नवा खाऊ असतो. तो बंद डब्यात ठेवलेला असतो. तो प्रसाद काय आहे हे मुलींना ओळखावे लागते. भुलाबाईची गाणी म्हटल्यावर खिरापत जिंकणे म्हणजे डब्यातील प्रसाद ओळखण्याची अनोखी स्पर्धा रंगते. डब्यातील खिरापत डबा हलवून, वाजवून ओळखायची.

भुलाबाईच्या गाण्यांनी आपले लोकसाहित्य समृद्ध केले आहे. हे केवळ मनोरंजन नव्हे, तर एकत्र कुटुंबपद्धतीचा गोडवा या गाण्यांमधून जाणवतो. सुनेची सासरी होणारी दमछाक भुलाबाईच्या गाण्यांतून व्यक्त होते. सासरचं सासरपण या गाण्यांतून कळतं.

ऐलमा पैलमा गणेशदेवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
सासूबाई सासूबाई मला मूळ आलं
जाऊ द्या ना माहेरा- माहेरा
गाणी संपल्यावर खिरापतही गाण्यातूनच मागितली जाते.
बाणाबाई बाणा
सुरेख बाणा…
गाणे संपले खिरापत आणा…

महिनाभर मांडलेल्या भुलाबाईची कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात, घराच्या अंगणात पूजा मांडली जाते. भुलाबी-भुलोबा-गणेशबाळाची ज्वारीच्या भरलेल्या कणसांसहीत पूजा केली जाते. बऱयाच घरात 31 दिवसांचा खाऊ खिरापत म्हणून एकाच दिवशी मिळतो. ही खिरापत पौष्टिक आणि चविष्ट असते. यामध्ये मोड आलेल्या मुगाची उसळ, हरभऱयाची उसळ, विविध पक्वान्ने, लाडू, चिवडा, चकली, पेढा इ. पदार्थांची चंगळ असते.

भुलाईचे एकमेव मंदिर

अकोला जिह्यातील अकोट शहरात भुलोबा-भुलाईचे एकमेव मंदिर आहे. हे 300 वर्षे पुरातन मंदिर आहे. पूर्वी या मंदिरामध्ये पाच फुटांपेक्षा मोठय़ा मातीच्या भुलोबा-भुलाई आणि गणेशबाळाच्या मूर्ती होत्या. पण मातीच्या असल्यामुळे त्या ढासळल्या. 1996च्या दरम्यान पुन्हा मंदिरात नव्या मूर्ती बसविल्या गेल्या. आता उत्सवाच्या वेळी महिनाभर मुली भुलाबाई देवीच्या मंदिरात पारंपरिक जुनी वऱहाडी गाणी म्हणतात.
आज कालानुरूप या उत्सवाचे प्रदीर्घ स्वरूप नऊ दिवसांवर किंवा सोयीप्रमाणे एक दिवसावर आले असले तरी वऱहाडात, खानदेशात, विदर्भात घरोघरी ते जपले जाते हे महत्त्वाचे आहे.

आपल्या मुंबई-पुण्यासारख्या शहरातही भोंडला खेळला जातो. पण घरोघरी खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आपण जर मोठय़ा उत्साहात गरबा, दांडिया खेळायला धावतो. त्याऐवजी छोटय़ा प्रमाणात प्रत्येक मराठी घरातून भुलाबाई-भुलोबाचा हा खेळ खेळला गेला तर आपली संस्कृती जतन होईलच, पण या महिन्यात उतरलेलं जागरूक देवीतत्त्व अजूनच प्रसन्न होऊन महाराष्ट्राच्या लाल-काळ्या मातीत नांदतं फुलतं राहील… हसत राहील.

आपली प्रतिक्रिया द्या