
मोबाईल क्रांतीमुळे गावागावांमध्ये फिरणारे पोस्टमन गायब झाले आहेत. कधी तरी कुठे एखादार पोस्टमन दिसतो. त्यातही पत्राचा वापर मोठय़ा प्रमाणात कमी झाल्याने नव्या पिढीला पत्र हे सुध्द माहिती नसल्यासारखे झाले आहे. त्यामुळे नव्या पिढीला पत्राची व पोस्टमनची माहिती व्हावी या उद्देशाने भूम येथील युवासैनिक प्रल्हाद अडागळे यांनी एक नवा उपक्रम राबवत त्यांच्या वाढदिवसादिनी ज्यांनी त्यांना सोशल मिडीयाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांचे आभार मात्र त्यांनी पत्र पाठवून मानले आहेत.
मोबाईल किंवा दळनवळन क्षेत्रातील क्रांतीपुर्वी पोस्टाचे पत्र हेच एकमेव संपर्काचे साधन असायचे. पोस्टमन गावांमध्ये आला किंवा गल्लीमध्ये आला की आपल्याला कोणाचे पत्र ओल की नाही ? याची उत्सूकता लागत होती. काहीतरी नवीन जुनी बातमी घेऊन पोस्टमॅन आला आहे याची आतुरता प्रत्येकाला असायची. पोस्टमन आपल्या घरापर्यंत सुख, दु:खाची बातमी घेऊन येत होता. त्यामुळे पोस्टमन हा सर्वसामान्यांना खूप जवळचा वाटायचा. एवढेच काय तर या पोस्टमन तसेच पत्रावर सिनेमामध्ये सुध्दा अनेक गाणी तयार झाली आहेत.
परंतु या डिजिटल युगाच्या स्पर्धेमध्ये पोस्टकार्ड, आंतरदेशीय कार्ड तसेच पोस्टमन गायब झाले आहेत. नव्या पिढीला तर पोस्टमन, पत्र हे केवळ गोष्टीतून ऐकावयास मिळतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र भूम येथील युवासैनिक प्रल्हाद अडगाळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगळा उपक्रम राबविला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ज्यांनी ज्यांनी सोशन मिडीया किंवा अन्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या अशांचे आभार मात्र त्यांनी पत्राद्वारे मानले आहेत. त्यांनी सुमारे एक हजार पत्र पाठवून आपल्या हितचिंतकाचे आभार व्यक्त केले आहेत. सध्याच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.






























































