
महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी हिंदुस्थानचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात त्यांना शपथ दिली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे 13 मे रोजी निवृत्त झाले. भूषण गवई हे आता 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत.
सुमारे दहा मिनिटे शपथविधी सोहळा चालला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विधी मंत्री अर्जुन राम मेघवाल, उद्योग मंत्री पीयुष गोयल, रसायन विभागाचे मंत्री जेपी नड्डा यांच्यासह सर्वेच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांची प्रामुख्याने उपस्थितीती होती. दरम्यान, 2007 साली सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायमूर्ती के जी बालाकृष्णन यांच्यानंतर न्या. गवई हे दुसरे दलित व्यक्ती ठरणार आहेत.
मोदींचा सरन्यायाधीशांच्या आईशी आपुलकीचा संवाद
नवे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांच्याकडे मोदी गेले आणि त्यांचा हात पकडून त्यांना अभिवादन केले तसेच आपुलकीने संवाद साधला. मोदी यांनी कमलाताई यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. यावेळी न्यायमूर्ती गवई यांचे बंधू राजेंद्र गवई यांनी समोर येऊन मोदी यांच्यासोबत हस्तांदोलन केले. दरम्यान, मोदींनी नागपूर दौऱ्यादरम्यान दीक्षाभूमीला भेट दिली होती त्यावेळीही मोदींनी कमलाताई गवई यांच्या प्रकृतीबाबत राजेंद्र गवई यांना विचारणा केली होती.
कारकीर्द
मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती गवई यांची ऑगस्ट 1992 ते 1993 पर्यंत नियुक्ती करण्यात आली. 17 जानेवारी 2000 पासून ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. 14 नोव्हेंबर 2003 रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आणि 12 नोव्हेंबर 2005 रोजी ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
कोण आहेत भूषण गवई
भूषण गवई हे महाराष्ट्रातील अमरावती येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्मा 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. सामाजिक कार्यकर्ते आणि बिहार तसेच केरळचे माजी राज्यपाल दिवंगत आर. एस. गवई यांचे ते पुत्र आहेत. ते 16 मार्च 1985 रोजी बार काऊन्सिलमध्ये सामील झाले आणि 1987 पर्यंत माजी महाधिवक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजा एस भोसले यांच्यासोबत त्यांनी काम केले. 1990 नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर संवेधानिक आणि प्रशासकीय कायद्यात प्रॅक्टिस केली. त्यांनी नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरवाती विद्यापीठाचे स्थायी वकील म्हणूनही काम पाहिले.