एका आठवड्यात भुतानमध्ये 90 टक्के नागरिकांचे लसीकरण, युनिसेफकडून कौतुक

भुतान या देशाने लसीकरणात जागतिक रेकॉर्ड केला आहे. अवघ्या एका आठवड्यात भुतानने 90 टक्के नागरिकांचे लसीकरण केले आहे. त्यात फक्त ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरुणांचाही समावेश आहे. भुतानच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार परदेशातून मिळालेल्या लसींचा या लसीकरणात मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. हिंदुस्थान आणि चीनसारख्या आवाढव्य लोकसंख्या असलेल्या शेजारील भुतानची लोकसंख्या अवघी 8 लाख इतकी आहे. 20 जुलैपासून भुतानमध्ये कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला.

भुतानच्या लसीकरणाचे युनिसेफनेही प्रशंसा केली आहे.युनिसेफचे भुतानचे अधिकारी विल पार्क्स म्हणाले की, भुतानने एवढ्या जलदगतीने लसीकरण राबवले ही कौतुकाची गोष्ट आहे. ज्या देशांकडे लसींचा अतिरिक्त साठा असले त्यांनी लसींचा तुटवडा असलेल्या देशांना दान करावे असे आवाहनही पार्क्स यांनी केले आहे.

हिंदुस्थानने भुतानला मार्च महिन्यात एक्स्ट्राजेनेका लसींचे 5 लाख डोस दिले होते. भुतानने तत्परतेने या लसींचा वापर करत लसीकरण मोहीम राबवली. त्यानंतर हिंदुस्थानने लसींची निर्यात थांबवल्याने भुतानमध्ये लसीकरण थंडावले होते.

लसींचा तुटवडा असल्याने भुतनाने इतर देशांकडे लसींची मागणी केली होती. तेव्हा अमेरिकेने भुतानला मॉर्डनाच्या लसीचे पाच लाख डोस दिले होते. त्यानंतर डेन्मार्कने जुलै महिन्यात एक्स्ट्राजेनेकाच्या अडीच लाख लसी दिल्या होत्या. आता भुतानला चीन, बुल्गेरिया, क्रोएशियाकडूनही लसी मिळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या