भुवनेश्वर कुमार ठरला मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हिंदुस्थानचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरकुमारला मार्च महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित केले. या मासिक पुरस्काराची सुरुवात झाल्यापासून सलग तिसऱया महिन्यात हिंदुस्थानी क्रिकेटपटूनेच यात बाजी मारली हे विशेष. भुवनेश्वरकुमारने या पुरस्काराच्या शर्यतीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान व झिम्बाब्वेच्या सीन विलयम्सला मागे टाकले.

भुवनेश्वरकुमारने मार्च महिन्यात इंग्लडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केली होती. भुवीने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 4.65 च्या सरासरीने 6 फलंदाज बाद केले, तर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 6.38 च्या सरासरीने 4 बळी टिपले होते. या दोन्ही मालिकेत भुवनेश्वरकुमार सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता. आयसीसीच्या सर्वोत्तम पुरस्कारामध्ये जानेवारी महिन्यातील पहिला पुरस्कार रिषभ पंतने, तर फेब्रुवारीतील दुसरा पुरस्कार रविचंद्रन अश्विनने पटकावला होता.

महिलांत लिजेल ली सर्वोत्तम

महिला गटात दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लिजेल ली मार्च महिन्यातील आयसीसीच्या ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्काराची मानकरी ठरली. तिने हिंदुस्थानी दौऱयावर वन डे मालिकेत एका शतकासह दोन अर्धशतके झळकावली होती. आयसीसीच्या वन डे क्रमवारीत लिजेलने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तिने या पुरस्काराच्या शर्यतीत राजेश्वरी आणि पूनम राऊत या हिंदुस्थानी खेळाडूंना पिछाडीवर टाकले.

आपली प्रतिक्रिया द्या