टीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवननंतर भुवनेश्वर बाहेर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा विजयरथ सुरुच असला तरी दुखापतीमुळे ड्रेसिंग रुम हॉस्पिटलचे वॉर्ड बनत आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन पाठोपाठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही जायबंदी झाला आहे. पायाचा स्नायू दुखावला गेल्याने भुवनेश्वर आगामी दोन ते तीन लढतींना मुकणार आहे. शिखर पाठोपाठ आणखी एक मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर गेल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत.

रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारच्या उजव्या पायाचा स्नायू दुखावला गेला. त्यामुळे तो गोलंदाजी सोडून पवेलियनमध्ये गेला. त्यानंतर त्याने मैदानात पाऊल ठेवले नाही. आगामी लढतीत भुवनेश्वरच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खेळणार आहे अशी माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली आहे.

विराट कोहली म्हणाला, भुवनेश्वरची दुखापत मोठी नाही. तो आगामी दोन ते तीन लढतींना मुकणार आहे. भुवनेश्वर संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. भुवनेश्वरच्या जागी मोहम्मद शमी खेळेल आणि वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक आहे. टीम इंडियाने रविवारी झालेल्या लढतीत पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा हा तिसरा विजय आहे. टीम इंडियाचा आगामी सामना 22 जूनला अफगाणिस्तानशी होणार आहे.