भुवनेश्वरच्या दुखापतीमुळे एनसीएचा पाय खोलात

428
bhuvneshwar-kumar

बीसीसीआय ही क्रिकेटमधील धनाढय़ संस्था. पण या अमाप पैशांचा उपयोग खेळाडूंसाठी होताना दिसत नाही. बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीत क्रिकेटपटूंच्या दुखापतीवर उपचार करण्यात येताहेत, पण यामधून ते खेळाडू झटपट बाहेर येताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीवर परिणाम होताना दिसत आहे.

यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याच्यानंतर आता भुवनेश्वरकुमारच्या दुखापतीचे उदाहरण यावेळी घेता येईल. भुवनेश्वरकुमार गेल्या जुलै महिन्यापासून गुडघ्याच्या दुखापतीने हैराण असून तो अद्याप फिट झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीच्या कारभारावरच संशय निर्माण झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे माघारी घेतली. यावेळी निवड समितीने भुवनेश्वरऐवजी उमेश यादवला पसंती दर्शवली. भुवनेश्वर सध्या एनसीएमध्ये उपचार घेत आहे, मात्र या ठिकाणी भुवनेश्वरला योग्य उपचार मिळत नसल्याने त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याचे कळतेय. एका इंग्रजी दैनिकामधून याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

बीसीसीआयने जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांडय़ाची दुखापत पाहता त्यांना उपचारासाठी इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र भुवनेश्वरबद्दल बीसीसीआयने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त असतानाही भुवनेश्वरची संघात निवड झाली. यादरम्यान त्याच्या दुखापतीमध्ये वाढ झाल्याचेही समजतेय.

आपली प्रतिक्रिया द्या