चेक क्लिअर होण्यासाठी आतापर्यंत दोन दिवसांचा कालावधी लागत होता, परंतु यापुढे चेक काही तासांतच क्लिअर होऊ शकणार आही. ज्या दिवशी बँकेत डिपॉझिट कराल त्याच दिवशी अगदी काही तासांतच रक्कम खात्यात जमा होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आज झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे व्यापारी वर्ग, बँका, संस्था, शिक्षण आणि आर्थिक जगतातील लोकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.
चेक काही तासांतच क्लिअर होणार असल्याने चेक देणारे आणि पैसे घेणारे या दोघांनाही याचा फायदा होणार आहे. तसेच त्यांच्या संपूर्ण प्रक्रियेला गती मिळाल्याने बँकिंगवरही सकारात्मक परिणाम दिसून येईल. चालू वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 7.2 टक्के राहील असेही दास यांनी सांगितले. बँकांची बॅलन्स शीट चांगली असून पंपन्यांची स्थितीही चांगली आहे. त्यामुळे गुंतवणुकीत आणखी वाढ होऊ शकते, जसजशी मागणी वाढेल तसतसे मॅन्युफॅक्चरिंग ऑक्टिव्हिटी वाढेल असेही त्यांनी नमूद केले.
व्याजदर जैसे थे
आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. त्यामुळे व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. परिणामी, सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आरबीआयने जूनमध्ये सलग आठव्यांदा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर ठेवला होता. आता नवव्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
यूपीआय मर्यादा वाढवली
यूपीआय व्यवहारांची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. सध्या यूपीआय मर्यादा 1 लाख रुपये आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरणा नियमित करणे हा या वाढीचा उद्देश असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.