सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, जीविका दीदांना ३० हजार रुपयांचे वेतन; तेजस्वी यादव यांनी केल्या तीन मोठ्या घोषणा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत तीन मोठ्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये जीविका दीदांना महिन्याला ३० हजार रुपयांचे वेतन आणि सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देणार असल्याची घोषणा केली. तसेच याआधीच त्यांनी आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर २० महिन्यांत प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी, असेही आश्वासन दिले होते.

तेजस्वी यादव म्हणाले की, “महिलांना १०,००० रुपये लाच म्हणून देण्यात आले, जे हे सरकार परत घेणार.” ते म्हणाले की, “संपूर्ण बिहार राज्य सध्याच्या सरकारवर संतापले आहे, जे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीने भरलेले आहे. या सरकारने आमच्या योजनांची नक्कल केली आहे.”

तेजस्वी यादव म्हणाले, “उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली, आता निवडणूक प्रचाराची वेळ आली आहे. बिहारच्या लोकांनी बदल घडवण्याचा निर्धार केला आहे आणि ते डबल इंजिन सरकारला कंटाळले आहेत. बेरोजगारी आणि महागाईच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या, परंतु सध्याच्या सरकारने त्यांच्या योजनांचीच नक्कल केली आहे.”