
आमदार, खासदार झाल्यावर ‘जनतेचा विकास करू’, अशी भाषा उमेदवार वापरत असतात. मात्र बिहार निवडणुकीत वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रांग लागली आहे. मात्र यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सायकलवर आलेल्या 55 वर्षीय राजेंद्र प्रसाद यांनी.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, शेखपुरा जिल्ह्यातील बरबीघा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजेंद्र प्रसाद सायकलवर आले होते. व्यवसायाने टेलर असलेल्या राजेंद्र प्रसाद यांनी आमदार म्हणून निवडून आल्यास आधी स्वतःचा विकास करू आणि मग गावाचा असा नारा दिला. यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे.

प्रसारमाध्यमासोबत बोलताना राजेंद्र प्रसाद म्हणाले की, आमदार म्हणून निवडून आल्यास आधी स्वतःचा विकास करणार आहे. आमदार झाल्यावर लोक दिल्ली, मुंबईला फ्लॅट खरेदी करतात आणि स्वतःची धनदौलत वाढवतात. त्यामुळे मी देखील स्वतःचे घर बनवणार आणि कुटुंबाचा विकास करणार, असे राजेंद्र प्रसाद म्हणाले. तसेच यानंतर गावाचा विकास करणार असेही ते म्हणाले.



























































