भाजपने पाठीत वार केला! बिहारमध्ये ‘जदयू’ आक्रमक; नितीशकुमारांच्या बैठकीत घमासान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विश्वासघातकी राजकारणावर जनता दल युनायटेड (जदयू) पक्ष आक्रमक झाला आहे. शनिवारी मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या बैठकीत जदयूच्या पराभूत उमेदवारांनी भाजपचे वाभाडे काढले. भाजपने पडद्यामागे वेगळाच डाव खेळला, पाठीत वार केला. आमच्या पराभवाला भाजपचेच कुटिल कारस्थान जबाबदार ठरले, अशा शब्दांत त्यांनी भाजपची पिसे काढली.

राज्यात एनडीएचे नवीन सरकार बनून दोन महिने झाले आहेत, मात्र जदयू नेत्यांच्या मनात भाजपविषयी खदखद कायम आहे. शनिवारी पक्षाची राज्य कार्यकारिणी आणि पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. या वेळी दिग्गज नेत्यांनी भाजपच्या ‘अंतरंगा’ची पोलखोल केली. नितीशकुमारांपुढे एकापाठोपाठ एक माजी आमदारांनी भाजपविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. चिराग पासवान हे एक मोहरा होते, प्रत्यक्षात पडद्यामागे सगळा खेळ भाजपनेच केला. त्यांच्या नेत्यांनी मदतीचे दावे केले, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मतदार व कार्यकर्त्यांनी जदयू उमेदवारांना कुठलीही साथ दिली नाही, असा दावा जदयू नेत्यांनी केला. सीमांचल प्रांतातील उमेदवारांनीही भाजपमुळे पक्षाचा मोठा तोटा झाल्याचा आरोप केला. एनआरसीबाबत भाजपचे धोरण एक व त्यांच्या माजी मंत्र्याने केलेले विधान वेगळे. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला व त्याचा फटका आम्हाला बसला, अशा शब्दांत त्यांनी पराभवाचे खापर भाजपवर फोडले.

आम्ही ‘एनडीए’सोबतच

‘जदयू’च्या बैठकीनंतर नितीशकुमार हे ‘दबावाखालील’ मुख्यमंत्री असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे बिहारच्या राजकारणात काही दिवसांत मोठी उलथापालथ होईल असे सांगण्यात येत होते. जदयूचे लोकसभेतील गटनेते ललन सिंह यांनी आम्ही एनडीएसोबतच आहोत असे स्पष्ट केले आहे. पक्षाला विधानसभेत कमी यश मिळाले असले तरी जनाधार कमी झालेला नाही असेही ते म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार लटकवला

नितीशकुमार यांनी दोन दिवसांत एनडीएबाबत दोन महत्त्वाची विधाने केली आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याआधीच्या कार्यकाळात मंत्रिमंडळ विस्तार कधीच लांबणीवर टाकला नव्हता. आता मात्र त्यांनी तो लटकवला आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, भाजपसोबत सर्व गोष्टींवर चर्चा होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार कसा करणार? भाजपच्या दबावामुळे नितीशकुमार हैराण आहेत का, याचे उत्तर काही दिवसांतच मिळेल असेही सांगण्यात येते.

कोण मित्र, कोण दुश्मन?

सत्तास्थापनेच्या 56 दिवसांनंतरही मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘कोण मित्र, कोण दुश्मन’ याच्याच शोधात आहेत. त्यांनीच तसे शनिवारी पत्रकारांना सांगितले. काही दिवसांपूर्वी स्वतःला ‘परिस्थितीवाला मुख्यमंत्री’ म्हणून संबोधणारे नितीशकुमार आता ‘दबावाखालील मुख्यमंत्री’ असे उघडपणे म्हणवून घेत आहेत. याची चर्चा बिहारमध्ये तर आहेच, पण स्वतःला ते पीडित का म्हणवून घेत आहेत, असाही प्रश्न आता विरोधक विचारत आहेत.