गोदी मीडिया! एक्झिट पोल दाखवणाऱ्यांनी याआधी इस्लामाबाद जिंकले होते!! तेजस्वी यादव यांचा टीव्ही चॅनल्सवर जबर हल्ला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जाहीर झालेले ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज स्पष्टपणे फेटाळून लावले. ‘हे गोदी मीडियाचे पोल आहेत, त्यांना कुठलाही ठोस आधार नाही. हे तेच ‘एक्झिट पोल’वाले आहेत ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर इस्लामाबाद, लाहोर आणि कराची जिंकल्याचे दावे केले होते, अशा शब्दांत तेजस्वी यांनी खिल्ली उडवली.

मतदानानंतर जाहीर करण्यात आलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर तेजस्वी बोलत होते. ‘आम्ही खोट्या आशेवर राहत नाही आणि गैरसमजही बाळगत नाही. निवडणुकीच्या आधीही असे सर्व्हे झाले होते. त्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांना 18 टक्के लोकांनीही पसंती दर्शवली नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ही दबावाची रणनीती

एक्झिट पोल ही दबावाची रणनीती असल्याचे तेजस्वी म्हणाले. ‘दुसऱ्या टप्प्यातील मतदान सात वाजेपर्यंत सुरू होते. अनेक लोक रांगेत होते. हे मतदान सुरू असतानाच एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. मतदारांवर प्रभाव आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर मानसिक दबाव टाकण्याचा हा प्रयत्न होता, असा आरोप तेजस्वी यांनी केला. एक्झिट पोल काहीही असोत, लोकांनी मोठ्या संख्येने सरकारच्या विरोधात मत दिले आहे. यावेळी परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

72 लाख मतांचा अर्थ काय?

मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 72 लाख मते जास्त पडली आहेत. ही मते 243 मतदारसंघांत विभागल्यास प्रत्येक ठिकाणी हा आकडा साधारण 30 हजारांच्या जवळ जातो. ही मते नितीश कुमार यांना वाचवण्यासाठी पडलेली नाहीत. सरकारला बदलण्यासाठी पडली आहेत, असेही तेजस्वी म्हणाले.

‘पीएमओ’मधून स्क्रिप्ट लिहून दिली जाते ती हे वाचतात!

‘एक्झिट पोल’चे मापदंड नेमके काय आहेत, किती लोकांची मते घेतली, काय प्रश्न विचारले गेले, पोलचे निकष काय होते यापैकी कशाचीही स्पष्टता नाही. एक्झिट पोल जाहीर करणाऱ्यांनाही हे निकष माहीत नसतील. पंतप्रधान कार्यालयातून अमित शहा वेगवेगळ्या चॅनेल्सना जे काही लिहून देतात, तेच हे लोक वाचतात, असे तेजस्वी यादव म्हणाले.