नीतीश कुमारांवर कौतुकाचा वर्षाव करत जीतनराम मांझी यांनी केला भाजपवर हल्ला

बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल फारसा प्रभाव दाखवू शकले नाही. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत पक्षातील अनेक नेत्यांनी निवडणुकीतील पराभवाला भाजपला जबाबदार ठरवले आहे. नीतीश कुमार यांनीही मित्र आणि शत्रू ओळखू शकलो नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आपले सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वासही व्यक्त केला होता. त्यानंतर एनडीएतील घटक पक्ष असलेल्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) चे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी नीतीशकुमारांवर कौतुकाचा वर्षाव करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

नीतीश कुमार आणि मांझी यांच्यातून विस्तव जात नसतानाही मांझी यांनी नीतीश कुमारांवर कौतुकाचा वर्षाव केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच एनडीएतील घटकपक्ष असूनही त्यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. भाजपचे नाव न घेता मांझी यांनी भाजपला कट रचणारा पक्ष असे म्हटले आहे. नीतीश कुमार यांच्यासोबत निवडणुकीत मोठा कट रचण्यात आला. निवडणुकीत त्यांना धोका देण्यात आल्याचेही मांझी यांनी म्हटले आहे.

आपले सरकार बिहारमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल,असा विश्वास नीतीश कुमार यांनी व्यक्त केला. त्यानंतर मांझी यांनी ट्विटरवर नीतीश कुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. नीतीश कुमार यांना युतीचा आणि मैत्रीचा धर्म पाळता येतो, असे सांगत त्यांनी नीतीश कुमार यांचे कौतुक केले आहे.

एनडीएतील अंतर्गत विरोध आणि कटकारस्थाने असूनही नीतीश कुमार त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे, ही नीतीश कुमार यांची महानता आहे, असे मांझी यांनी म्हटले आहे. राजकारणात युतीचा धर्म पाळत सहकार्य कसे करावे, याचा आदर्श नीतीश कुमार यांच्याकडून घेण्यासारखा असेही ते म्हणाले. त्यामुळेच नीतीश कुमार राजकारणात महान असल्याचे ते म्हणाले.

नीतीश कुमार यांच्या महानतेला मांझीचा सलाम, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. एनडीएमध्ये ताळमेळ नसतानाही जीतनराम मांझी चर्चेत आहेत. मंत्रिमंडळात आणखी एक पद मिळवण्यासाठी आणि एलएमसी जागेसाठीही ते एनडीवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे. आता नीतीश कुमार यांचे कौतुक करत त्यांनी भाजपवर हल्ला केल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या